Ahana Deol | बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्यानंतर चाहत्यांसह त्यांच्या सहा मुलांमध्ये शोककळा पसरली. धर्मेंद्र यांच्या अभिनयाप्रमाणेच त्यांच्या कुटुंबातील आठवणी आणि गोष्टी आता पुन्हा समोर येत आहेत. अशात अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी अहाना देओल हिच्या मुलाखतीतील एक भावनिक आठवण विशेष चर्चेत आली आहे. (hana Deol Interview)
अहाना देओलने (Ahana Deol) काही वर्षांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत वडिलांशी असलेल्या नात्याविषयी आणि त्यांच्या संपत्तीतील तिला काय हवंय याबद्दल मनमोकळेपणाने सांगितले होते. धर्मेंद्र यांच्या कोट्यवधींच्या प्रॉपर्टीमधून (Dharmendra Property) तिला बंगला, जमीन, पैसा काहीही नको, तर एक खास भावनिक बाब तिच्यासाठी सर्वात मौल्यवान आहे. तिच्या या निवडीने तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटले होते आणि आता पुन्हा ती चर्चा रंगत आहे.
धर्मेंद्र यांच्या वारश्यातून मुलीची भावनिक इच्छा :
अहानाने मुलाखतीत सांगितले होते की, “जर मला वडिलांच्या वारशातून काही घ्यायचं असेल, तर मला त्यांची पहिली कार Fiat हवी आहे. माझ्यासाठी ती फक्त एक गाडी नाही, तर माझ्या बालपणीच्या असंख्य आठवणींचा खजिना आहे.” ही कार धर्मेंद्र यांना अत्यंत प्रिय होती आणि अहानाच्या लहानपणीच्या प्रत्येक खास क्षणांशी ती जोडलेली होती.
तिने पुढे सांगितले की, ती सहा वर्षांची असताना धर्मेंद्र लोनावळ्याच्या फार्महाऊसला जात असत. एका प्रसंगी ते निघताना तिने त्यांच्यासोबत यायचा हट्ट केला. अचानक निर्णय घेत त्यांनी तिची बॅग भरली आणि तिला सोबत घेऊन गेले. त्या प्रवासातील अनुभव, कारमध्ये वडिलांच्या मांडीवर बसण्याची भावना आणि त्यांच्यासोबतचा तो मौल्यवान वेळ हे क्षण ती आजही प्रेमाने जपून ठेवते.
Ahana Deol | अहानाची बालपणीची एक वेगळी संघर्षकथा :
अहानाने मुलाखतीत आणखी एक गमतीशीर पण भावनिक बाब सांगितली होती. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचा रोमँस मोठ्या पडद्यावर पाहताना तिला तेव्हा राग यायचा. ती म्हणाली होती, “मी लहान होते तेव्हा त्यांच्या ऑन-स्क्रीन रोमँसने मी गोंधळून जायची. मला ते आवडायचं नाही. आई नेहमी समजवायची की, हे फक्त अभिनय आहे, त्यांचं काम आहे. पण माझ्यासाठी ते समजून घेणं सुरुवातीला खूप अवघड होतं.” (hana Deol Interview)
अहाना देओल (Ahana Deol) आज अभिनयापासून दूर आहे आणि ती तिच्या खासगी आयुष्याला प्राधान्य देते. तिच्या पतीचं नाव वैभव वोहरा असून ती चर्चा किंवा ग्लॅमरपासून नेहमी दूर राहते. पण वडिलांबद्दलच्या तिच्या आठवणी आणि त्यांच्याशी असलेलं घट्ट नातं आजही लोकांच्या मनाला भावतं.






