अजितदादांच्या अपघातापूर्वीच्या बैठकीत काय ठरलं होतं? फडणवीसांनी स्पष्टचं सांगितलं

On: February 23, 2026 2:50 PM
Devendra Fadnavis (1)
---Advertisement---

Devendra Fadnavis | अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघातानंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या भीषण अपघाताच्या आदल्या दिवशी त्यांची आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची बैठक झाली होती. त्या बैठकीत काय घडले याबाबत आज विधानसभेत फडणवीस यांनी भावनिक शब्दांत आठवणी सांगितल्या.

अर्थसंकल्पापूर्वीची बैठक आणि भावनिक शोकप्रस्ताव :

राज्याच्या अर्थसंकल्पीय (Budget) अधिवेशनाची सुरुवात आजपासून झाली असून यंदाचा अर्थसंकल्प अजित पवार सादर करणार होते. गेल्या काही दिवसांपासून ते अर्थसंकल्पाच्या तयारीत व्यस्त होते. मात्र 28 जानेवारी 2026 रोजी त्यांच्या विमानाला अपघात झाला आणि राज्याने एक मोठा नेता गमावला. विधानसभेत शोकप्रस्ताव मांडताना देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी कधीच असा प्रसंग ओढवेल असे वाटले नव्हते, असे सांगितले. लाडकी बहीण योजना सुरू करताना अजित पवार यांनी गुलाबी जॅकेट परिधान केले होते आणि सर्वांनाही तसेच जॅकेट घालण्याचा आग्रह धरला होता, अशी आठवण त्यांनी करून दिली. शोकप्रस्ताव मांडणे ही घटनात्मक जबाबदारी असली तरी वैयक्तिकदृष्ट्या हा क्षण अत्यंत वेदनादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

निर्णय घेताना अजित पवार कधीही दुमत ठेवत नसत, असे सांगताना फडणवीस भावूक झाले. “काळ हे औषध असते” असे आपण म्हणतो, पण अशा दुःखावर वेळही मलम ठरत नाही, असे ते म्हणाले. सकाळी 6 वाजल्यापासून कामाला सुरुवात करणारे शिस्तप्रिय नेते म्हणून त्यांची ओळख होती. प्रत्येक काम नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण व्हावे, हा त्यांचा आग्रह असे. 22 जुलै हा दोघांचाही वाढदिवस असल्याची आठवण सांगत, वयाने मोठे असल्याने ते माझ्यासाठी दादा होते, असे फडणवीसांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis | 27 जानेवारीची शेवटची भेट आणि अनपेक्षित धक्का :

27 जानेवारी 2026 रोजी दोघांमध्ये बैठक झाली होती. त्या बैठकीतही अजित पवार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले आणि कामकाजाचा आढावा घेतला. अधिकृत चर्चा पूर्ण झाल्यानंतर दोघे अँटी चेंबरमध्ये गेले. तेथे सुमारे 30 ते 40 मिनिटे विविध विषयांवर संवाद झाला. त्यानंतर अजित पवार तेथून निघून गेले. मात्र तीच भेट शेवटची ठरेल, याची कल्पनाही त्या वेळी नव्हती, असे फडणवीसांनी सांगितले.

अपघाताची बातमी समजल्यावर सुरुवातीला फारशी गंभीर बाब नसावी असे वाटले, पण नंतर निधनाची बातमी आली आणि धक्का बसला, असे त्यांनी नमूद केले. गेल्या दशकभरात दोघांमध्ये मैत्री आणि जवळीक निर्माण झाली होती. 2014 नंतर हे नाते अधिक भावनिक बनले. आता त्या सर्व आठवणीच उरल्या असून एक जिवलग मित्र गमावल्याची खंत कायम राहील, असे फडणवीसांनी सांगितले.

News title : Devendra Fadnavis Recalls Last Meeting With Pawar

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now