ठाकरे सेनेच्या ‘त्या’ बड्या नेत्याला अटक होणार? फडणवीसांच्या विधानाने खळबळ

On: January 12, 2026 1:39 PM
Devendra Fadnavis,
---Advertisement---

Devendra Fadnavis | राज्यातील कोव्हीड घोटाळ्यावरून राजकीय वातावरण पुन्हा तापले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा इशारा दिला आहे. कोव्हीड काळातील घोटाळ्यांप्रकरणी ठाकरेंच्या सेनेतील एका बड्या नेत्याला अटक होण्याची शक्यता असल्याचे संकेत फडणवीस यांनी दिले. मात्र कोणाचं नाव घेणं सध्या शक्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

“अटक होईल की नाही, हे तपास यंत्रणांच्या हातात असतं. हा आरोपासाठी आरोप नाही. ज्या-ज्या घोटाळ्यांमध्ये पुरावे मिळाले, त्या सर्व प्रकरणांत संबंधितांना तुरुंगात जावं लागलं आहे. वरच्या पातळीपर्यंत पुरावे पोहोचले, तर पोलीस आपली कारवाई करतील,” असे स्पष्ट मत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केले.

मुंबई-गुजरात कनेक्टिव्हिटीवर टीका :

मुंबईला गुजरातशी जोडण्याचा आरोप करत विरोधकांनी केलेल्या वक्तव्यांवर देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली. “यापेक्षा मूर्खपणाचं विधान असू शकत नाही,” असे म्हणत त्यांनी हा आरोप फेटाळून लावला. मुंबईला दोन विमानतळांची गरज होती आणि दुसरा विमानतळ आम्हीच उभारला, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

मुंबईच्या विकासाला खीळ बसली असल्यास त्यामागे एकाच विमानतळाची मर्यादा कारणीभूत असल्याचे फडणवीस म्हणाले. मुंबई विमानतळाचा आराखडा 1992 पासून प्रलंबित होता. अनेक सरकारे आली-गेली, पण कोणीही ठोस निर्णय घेतला नाही. अखेर आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर हा प्रकल्प मार्गी लावल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रकल्प सुरुवातीला अदानी समूहाचा नव्हता, तर जीव्हीकेकडे होता आणि नंतर शेअर्स खरेदीद्वारे अदानीने तो ताब्यात घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis | वाढवण बंदरावर स्पष्टीकरण :

वाढवण बंदराबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संपूर्ण देशात बंदरासाठी सर्वात उत्तम जागा वाढवणची आहे. नैसर्गिक डीप ड्राफ्ट असलेलं वाढवणसारखं बंदर कोणत्याच राज्यात नाही. जगातील मोठमोठी जहाजं वाढवणमध्ये सहज येऊ शकतात, अशी माहिती त्यांनी दिली. (Shiv Sena Leader Arrest)

1990 च्या दशकात वाढवण बंदराचा निर्णय अंतिम झाला होता. मात्र डहाणू हा निसर्ग संवेदनशील भाग असल्याचा मुद्दा उपस्थित करत काही लोकांनी न्यायालयात धाव घेतली आणि सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. त्यानंतर न्यायमूर्ती धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. समितीच्या अहवालानंतर आणि सर्व पर्यावरणीय मंजुऱ्या घेतल्यानंतरच बंदर प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाल्याचे फडणवीस म्हणाले. (Covid Scam Maharashtra)

आज वाढवण पोर्ट हा भारतातील सर्वात मोठा बंदर प्रकल्प असून तो जगातील अव्वल 10 बंदरांमध्ये स्थान मिळवणारा आहे. याआधी जेएनपीटी हे देशातील सर्वात मोठे बंदर होते, मात्र वाढवण पोर्ट त्यापेक्षा दुप्पट क्षमतेचा असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

News Title : Devendra Fadnavis Hints at Arrest of Big Shiv Sena Leader in Covid Scam

कोव्हीड घोटाळा, देवेंद्र फडणवीस, शिवसेना, उद्धव ठाकरे, वाढवण बंदर, मुंबई विकास
Covid Scam Maharashtra, Devendra Fadnavis, Shiv Sena Leader Arrest, Vadhavan Port, Mumbai Politics

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now