Malti Chahar | गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील कास्टिंग काउचचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अनेक अभिनेत्री पुढे येत आपले अनुभव मोकळेपणाने मांडत आहेत. अशातच आता भारतीय क्रिकेटपटू दीपक चहर (Dipak Chahar) यांची बहीण मालती चहर हिने केलेला खुलासा सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मालतीनं चित्रपटसृष्टीतील कटू वास्तव सांगत, एका ज्येष्ठ बॉलिवूड दिग्दर्शकाने आपल्याशी गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप केला आहे. (Malti Chahar Casting Couch)
मालती चहर बिग बॉस 19 मधून चर्चेत आली होती. शोदरम्यान तिचा प्रवास चढ-उतारांनी भरलेला राहिला. फायनलच्या शर्यतीत असतानाच तिला घराबाहेर पडावं लागलं होतं. बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर मालती सातत्याने मुलाखती देत असून, आता तिनं इंडस्ट्रीतील आपल्या अनुभवांबद्दल स्पष्टपणे बोलायला सुरुवात केली आहे. तिने अनिल शर्मा यांच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
‘तो माझ्या वडिलांच्या वयाचा होता’, म्हणत व्यक्त केली वेदना :
मुलाखतीत मालतीनं सांगितलं की, करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिला कास्टिंग काउचचा सामना करावा लागला. एका प्रसिद्ध आणि वयस्कर दिग्दर्शकाने तिच्याशी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप तिनं केला. “तो माणूस माझ्या वडिलांच्या वयाचा होता. कामाच्या निमित्ताने मी त्याच्या ऑफिसमध्ये गेले असताना त्याने थेट माझ्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला,” असं धक्कादायक विधान मालतीनं केलं. (Malti Chahar Casting Couch)
मालतीनं हेही सांगितलं की, या प्रकारामुळे ती पूर्णपणे हादरली होती. “त्या क्षणी मला काय करावं हेच समजत नव्हतं. मी त्याला तिथेच थांबवलं आणि त्यानंतर पुन्हा कधीही त्याच्याशी संपर्क साधला नाही,” असं तिनं स्पष्ट केलं. इंडस्ट्रीत नवीन असताना असे अनुभव आले, हे स्वीकारणं तिच्यासाठी खूप कठीण होतं, असंही ती म्हणाली.
Malti Chahar | ‘इथे कोणी कोणाचं नसतं’ :
पुढे बोलताना मालती चहर (Malti Chahar Interview) म्हणाली की, चित्रपटसृष्टीत काम करताना तिला एक कटू सत्य जाणवलं, ते म्हणजे “इथे कोणी कोणाचं नसतं”. काही लोकांनी वारंवार मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केला, मात्र आपण कोणालाही यशासाठी तडजोड करू दिली नाही, असं ती ठामपणे सांगते. “काही जण बोलतानाही चुकीचं वागतात. तुम्ही कसे बोलता, वागता यावरूनच ते तुम्हाला ओळखतात,” असा आरोप तिनं केला.
मालतीनं हेही स्पष्ट केलं की, आपल्या सोबत घडलेल्या काही घटनांची माहिती तिनं आपल्या कुटुंबालाही दिली होती. “इथे काम मिळवण्यासाठी तडजोड करा, नाहीतर काम नाही, असा अप्रत्यक्ष दबाव अनेकांवर टाकला जातो,” असं सांगत तिनं बॉलिवूडमधील कास्टिंग काउचच्या वास्तवावर बोट ठेवलं आहे.






