Vijay Wadettiwar | राज्य सरकारने 2 सप्टेंबर रोजी आरक्षणाबाबत काढलेल्या शासन निर्णयावर काँग्रेस (Congress) नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने 10 ऑक्टोबरपर्यंत जीआरमधील ‘पात्र’ हा शब्द वगळून स्पष्ट भूमिका घेतली नाही, तर ओबीसी (OBC) समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा त्यांनी दिला.
ओबीसी आरक्षणावरून वडेट्टीवार संतापले
ते म्हणाले, “जर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचे म्हणणे असेल की जीआरच्या विरोधात बोलणाऱ्यांना विरोध करा, तर मग त्यांच्या हातात एके-47 द्या आणि ओबीसी समाजाचा खात्मा करायला सांगा. आम्ही आमच्या आरक्षणाचे रक्षण करायचे नाही का?”, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
वडेट्टीवार पुढे म्हणाले, “समाजातील बाकीच्यांनी जगायचं की नाही, हे जरांगे पाटलांनीच ठरवायचं का? ही सत्तेची दादागिरी आहे. जर त्यांना एवढं समाधान हवं असेल, तर तलवारी, बंदुका द्या आणि आमची मुंडकी छाटून टाका, म्हणजे त्यांचा राग शांत होईल.”
त्यांनी सरकारवर आरोप केला की, “राज्य सरकार मनोज जरांगे पाटलांच्या दबावाखाली ओबीसी समाजाचा गळा घोटत आहे. कालच्या बैठकीत आम्हाला अपेक्षा होती की, सरकार हा जीआर रद्द करेल. पण सरकारने कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. हा जीआर असंवैधानिक असून, ओबीसी समाजावर अन्याय करणारा आहे.”
“मराठा आणि कुणबी हे वेगळे समाज”
वडेट्टीवार म्हणाले, “सरकारच्या या निर्णयामुळे ओबीसी समाजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की मराठा आणि कुणबी हे वेगळे समाज आहेत. तरीसुद्धा सरकार सर्रासपणे मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देत आहे. त्यामुळे ओबीसी समाज रोजगारात, मंडळांवर आणि सत्ताकेंद्रांमध्ये हळूहळू अदृश्य होईल.”
ते पुढे म्हणाले, “2 सप्टेंबरचा जीआर महाराष्ट्रातील 374 जातींवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे आम्ही 10 ऑक्टोबरला मोर्चा काढणार आहोत. सुरुवातीला या जीआरमध्ये ‘पात्र’ हा शब्द नव्हता, पण एका तासात तो शब्द घालण्यात आला. हा सर्व निर्णय दबावाखाली झाला आहे.”
शेवटी त्यांनी सरकारवर हल्लाबोल करत म्हटलं, “ज्यांच्याकडे सत्ता, संपत्ती आणि ऐश्वर्य आहे, त्या समाजांना आणखी आरक्षण देण्याची ही मागणी चुकीची आहे. ओबीसींच्या ताटातील घास कुणालाच घेऊ देणार नाही.”
दरम्यान मागच्या काही महिन्यांपासून ओबीसी आणि मराठा समाजातील संघर्ष विकोपाला गेला आहे. तसेच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी ओबीसी नेत्यांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याने हा संघर्ष अधीकच तीव्र झाला आहे.






