Pune Politics l पुणे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाला विधानसभेतील पराभवानंतर आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संग्राम थोपटे (Sangram Thopate) भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. काही दिवसांपूर्वीच रविंद्र धंगेकर यांनी पक्ष सोडल्याने ही घडामोड काँग्रेससाठी आणखी अडचणीची ठरू शकते.
राष्ट्रवादीच्या विरोधामुळे थांबलेला प्रवेश आता शक्यतेच्या उंबरठ्यावर :
रायगड दौऱ्यावर आले असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या उपस्थितीत संग्राम थोपटे यांचा भाजपात प्रवेश होणार होता, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी विरोध दर्शविल्यामुळे तो काही काळासाठी लांबवण्यात आला. भोर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा विद्यमान आमदार असल्यामुळे पक्षातील असंतोष टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. तथापि, आता या प्रवेशाची शक्यता पुन्हा एकदा वाढली आहे.
रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी अलीकडेच काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला. त्याचप्रमाणे संग्राम थोपटेही भाजपात येण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षातील अडचणी अधिक तीव्र होताना दिसत आहेत.
Pune Politics l भोर मतदारसंघात प्रभावशाली नेते, परंतु वाद आणि आरोपांच्या भोवऱ्यात :
संग्राम थोपटे हे भोर विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिले आहेत. त्यांचे वडील अनंतराव थोपटे यांनी तब्बल सहा वेळा याच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यामुळे या भागात थोपटे घराण्याचा प्रभाव मोठा आहे. मात्र मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकर मांडेकर यांनी त्यांचा पराभव केला होता.
संग्राम थोपटे यांचं पवार कुटुंबाशी जुना वाद आहे. माजी अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर थोपटे यांचं नाव पुढे आलं होतं, पण शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विरोधामुळे त्यांना संधी मिळाली नाही, अशी चर्चा आहे. नंतर मात्र शरद पवार यांनी स्वतः अनंतराव थोपटे यांची भेट घेऊन मतभेद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना बारामतीत फायदा झाला होता.
विवाद आणि न्यायालयीन कारवाईंचा पगडा :
संग्राम थोपटे यांच्यावर संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेतील कथित गैरव्यवहाराचे आरोप झाले आहेत. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल झाली असून 14 जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे. वित्त विभाग सादर करणार असलेलं शपथपत्र हे त्यांच्या विरोधात जाऊ शकतं, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
तसेच रायरेश्वर मंदिर (Raireshwar Temple), जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती, ते मंदिर थोपटे यांच्या संस्थेच्या ताब्यात आहे. या मंदिराच्या व्यवस्थापनावरूनही वाद निर्माण झाले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वीच या मंदिराचा ताबा घेत मोठी शिवसृष्टी उभारण्याचा इशारा दिला होता.






