Chanakya Niti | मान-सन्मान हा प्रत्येकाच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. अनेकदा काही जण अपमान सहन करून शांत राहणे पसंत करतात, पण हे नेहमीच योग्य ठरते का, असा प्रश्न निर्माण होतो. अपमानाला कशा पद्धतीने सामोरे जावे आणि त्यातून स्वतःची उंची कशी वाढवावी, याबाबत आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी आपल्या चाणक्यनीतीत मार्गदर्शन केले आहे.
अपमान सहन करण्याची मर्यादा काय? :
आचार्य चाणक्य (Aacharya Chanakya) यांच्या मतानुसार, एखाद्याने एकदा अपमान सहन केला तर त्याला समजूतदार म्हणता येते. दुसऱ्यांदा त्याच परिस्थितीत संयम दाखवला तर त्याचे मोठेपण अधोरेखित होते. मात्र वारंवार अपमान सहन करत राहणारा मनुष्य शहाणा नसून अयोग्य ठरतो, असे ते स्पष्ट करतात. त्यांच्या मते, सन्मानाची किंमत मानवी जीवनात अत्यंत मोठी आहे आणि ती मृत्यूपेक्षाही अधिक मौल्यवान आहे.
अपमान सहन करून गप्प बसणे ही नेहमीच योग्य भूमिका नसते. अपमानाचा अनुभव हा विषापेक्षाही अधिक कडू असतो, असे ते सांगतात. जर एखादी व्यक्ती सतत कमी लेखत असेल किंवा सार्वजनिकरित्या अपमान करत असेल, तर योग्य वेळी ठाम शब्दांत उत्तर देणे आवश्यक आहे. अन्यथा तुमचे मौन लोक दुर्बलतेचे लक्षण समजू शकतात आणि त्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो.
Chanakya Niti | शांततेतून मिळणारा प्रभावी प्रतिसाद :
चाणक्यनीतीत रागाच्या भरात प्रतिक्रिया देण्याऐवजी विवेकाने वागण्यावर भर देण्यात आला आहे. कोणी अपमान केल्यास संतापाने बोलण्याऐवजी शांत आणि नम्र वर्तन ठेवणे अधिक परिणामकारक ठरू शकते. अशा संयमित प्रतिसादामुळे समोरच्याला स्वतःची चूक उमगते आणि भविष्यात तो असे वर्तन करण्यापूर्वी विचार करतो.
जे लोक इतरांना कमी लेखतात किंवा त्यांचा अपमान करतात, त्यांना आयुष्यात अनेक अडचणी आणि अपयशांचा सामना करावा लागतो, असेही ते नमूद करतात. अशा व्यक्तींशी आवश्यक तेवढाच संबंध ठेवणे हितावह आहे. अपमान मनावर बाळगण्याऐवजी त्याला प्रेरणेत रूपांतरित करा, स्वतःला अधिक सक्षम आणि यशस्वी बनवा. इतकी प्रगती करा की आज टीका करणाऱ्यांनाच उद्या तुमच्या यशाची दखल घ्यावी लागेल. अशा प्रकारे अपमानाचा बदला सूडाने नव्हे, तर यश आणि चारित्र्याने घ्यावा, हा चाणक्यांचा संदेश आहे.






