Cancer Detection l न्यूयॉर्क (New York) येथील वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनामुळे, एखाद्या व्यक्तीला भविष्यात कर्करोग (cancer) होण्याचा धोका किती आहे, हे जन्माच्या आधीच समजणे शक्य होणार आहे. जगभरात कर्करोगाचे प्रमाण वाढत असताना, या संशोधनामुळे लवकर निदान होऊन, योग्य उपचार मिळण्यास मदत होईल. ‘नेचर कॅन्सर’ (Nature Cancer) जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे.
एपिजेनेटिक स्थितीमुळे कर्करोगाचा धोका :
शास्त्रज्ञांनी दोन वेगवेगळ्या एपिजेनेटिक (Epigenetic) स्थिती ओळखल्या आहेत, ज्या व्यक्तीमध्ये कर्करोगाचा धोका किती असेल, हे दर्शवतात. या स्थिती गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या टप्प्यातच विकसित होतात. एपिजेनेटिक्स DNA मध्ये कोणताही बदल न करता जनुकीय कार्य नियंत्रित करतात. यातील एका स्थितीत कर्करोगाचा धोका कमी होतो, तर दुसऱ्या स्थितीत तो वाढतो.
संशोधकांनी उंदरांवर केलेल्या प्रयोगात, ट्रिम-२८ (Trim-28) जनुकाची पातळी कमी असलेल्या उंदरांमध्ये, कर्करोगाशी संबंधित जनुकांवर एपिजेनेटिक मार्कर दोन भिन्न पद्धतींमध्ये आढळून आले. प्रत्येक असामान्य पेशी कर्करोगात रूपांतरित होत नाही, असेही या संशोधनात दिसून आले.
Cancer Detection l कर्करोगाच्या धोक्याची विभागणी :
मिशिगनमधील (Michigan) व्हॅन अँडेल इन्स्टिट्यूटच्या (Van Andel Institute) संशोधकांच्या निरीक्षणानुसार, कमी धोका असलेल्या लोकांमध्ये ल्युकेमियासारख्या (Leukemia) द्रवरूप ट्यूमर (Tumor) विकसित होण्याचा धोका अधिक असतो. तर, जास्त धोका असलेल्या रुग्णांमध्ये फुफ्फुस किंवा प्रोस्टेट कर्करोगाचा धोका अधिक असतो.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीनुसार, २०२० मध्ये जगभरात कर्करोगामुळे १ कोटी मृत्यू झाले. सहापैकी एका व्यक्तीचा मृत्यू कर्करोगाने होतो. स्तनाचा कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग यांचे प्रमाण वाढले आहे. १/३ मृत्यू हे तंबाखू, मद्यपान, लठ्ठपणा, फळे आणि भाज्यांचे कमी सेवन आणि शारीरिक हालचालींचा अभाव यांमुळे होतात. उच्च-जोखीम असलेल्या प्रोस्टेट कर्करोगाच्या रुग्णांना शस्त्रक्रिया किंवा रेडिओथेरपीद्वारे (Radiotherapy) उपचार मिळत नाहीत.






