BMC Exit Poll 2026 | मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण होताच आता राजकीय वर्तुळाचे लक्ष एक्झिट पोलकडे लागले आहे. एक्झिट पोल समोर आला असून या अंदाजानुसार मुंबईत सत्तांतर होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या तब्बल २५ वर्षांपासून मुंबई महापालिकेवर सत्ता असलेल्या ठाकरे गटाला हा एक्झिट पोल मोठा धक्का देणारा ठरू शकतो. (BJP Shinde Alliance)
एक्झिट पोलमध्ये भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या शिवसेनेच्या युतीला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेतील दीर्घकाळ चाललेली ठाकरे यांची सत्ता संपुष्टात येण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे.
एक्झिट पोल काय सांगतो? :
एक्झिट पोलनुसार मुंबई महापालिकेच्या एकूण जागांपैकी भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेच्या युतीला तब्बल १३८ जागा मिळण्याची शक्यता आहे. या आकडेवारीमुळे महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दुसरीकडे ठाकरे बंधूंची शिवसेना आणि शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस यांना मिळून केवळ ६२ जागांवर समाधान मानावे लागेल, असे भाकीत करण्यात आले आहे.
या आकडेवारीमुळे मुंबईतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. विशेष म्हणजे १९९७ पासून मुंबई महापालिकेवर सत्तेत असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा एक्झिट पोल मोठा धक्का मानला जात आहे.
BMC Exit Poll 2026 | इतर पक्षांची कामगिरी :
जनमतच्या अंदाजानुसार काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला मिळून सुमारे २० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतर पक्ष आणि अपक्षांना मिळून सुमारे ७ जागा मिळू शकतात, असेही या एक्झिट पोलमध्ये नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, एक्झिट पोलनुसार देखील मुंबईत भाजपची सत्ता येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या एक्झिट पोलमध्ये मतदानाच्या टक्केवारीचेही विश्लेषण करण्यात आले असून महायुतीला ४२ ते ४५ टक्के मतदान मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसे यांना ३४ ते ३७ टक्के मतदान मिळेल, तर काँग्रेस आणि वंचित आघाडीला १३ ते १५ टक्के मतदान मिळण्याचा अंदाज आहे. इतर पक्षांना ६ ते ८ टक्के मतदान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Thackeray Shivsena)
या सर्व एक्झिट पोलमुळे मुंबईच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत असून प्रत्यक्ष निकालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.






