Uddhav Thackeray | मुंबई महापालिकेसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा प्रचार सोमवारी संध्याकाळी संपला. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सर्वच प्रमुख पक्षांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde), अजित पवार (Ajit Pawar), मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सभा राज्यभर गाजल्या. मात्र प्रचार संपण्याच्या अगदी शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे.
निवडणूक प्रचाराच्या काळात मोठ्या प्रमाणावर पक्षांतर पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली सुरू होत्या. अशातच प्रचार संपण्याच्या दिवशीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी अनपेक्षित आणि धक्कादायक घडामोड घडली.
गोरेगावमधील दोन माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश :
मुंबई महानगरपालिकेच्या (Mumbai Mahapalika) प्रचाराच्या अखेरच्या दिवशी गोरेगाव विभागातील उबाठा गटाचे माजी नगरसेवक दिलीप शिंदे आणि त्यांची पत्नी माजी नगरसेविका प्रमिला दिलीप शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला असून त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
या प्रवेशामुळे गोरेगाव परिसरातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशीच हा प्रवेश झाल्याने उबाठा गटासाठी ही घटना अधिकच धक्कादायक ठरली आहे.
Uddhav Thackeray | शिंदे गटाची ताकद वाढली, मुंबईत लढत आणखी चुरशीची :
या प्रवेशावेळी उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant), शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्यासह अनेक शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी दिलीप आणि प्रमिला शिंदे यांचे पक्षात स्वागत करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या पक्षप्रवेशामुळे शिंदे गटाची मुंबईतील संघटनात्मक ताकद वाढल्याचं मानलं जात आहे. (Mumbai Municipal Election)
शिवसेना फुटल्यानंतर मुंबईची सत्ता टिकवण्याचं मोठं आव्हान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोर आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राज ठाकरे यांची मनसे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची युती आहे, तर भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि आरपीआय आठवले गट यांची आघाडी लढत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची बनली असून १५ तारखेला होणाऱ्या मतदानातून मुंबईकर कोणाच्या हाती सत्ता देतात, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.






