BMC Election 2026 | मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून, लोकशाहीच्या या प्रक्रियेत नागरिक उत्साहाने सहभागी होत आहेत. मात्र मुंबई महानगरपालिका निवडणुकीदरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मतदान करून परतलेल्या काही मतदारांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या घटनेमुळे मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विरोधी पक्षांकडून आधीपासूनच निवडणूक आयोगाच्या काही निर्णयांवर संशय व्यक्त केला जात असताना, मतदानाच्या दिवशीच अशा प्रकारामुळे वातावरण तापले आहे. विशेष म्हणजे यंदा पारंपरिक शाईऐवजी मार्करचा वापर करण्यात आल्याची बाब या वादाच्या केंद्रस्थानी आली आहे.
शाईऐवजी मार्करचा वापर; आयुक्तांनी दिली कबुली :
यंदाच्या मुंबई महानगरपालिका (Mumbai Mahapalika) निवडणुकीत मतदान करणाऱ्या नागरिकांच्या बोटावर शाई न लावता मार्करने खूण केली जात आहे. मात्र ही खूण बोटावरून पुसली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. काही मतदारांनी मतदानानंतर काही वेळातच नखावरील मार्करची शाई निघून गेल्याचे निदर्शनास आणून दिले.
या संपूर्ण प्रकरणावर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी प्रतिक्रिया देत, बोटावर मार्करने खूण केल्यानंतर नखावरील शाई काही प्रमाणात पुसली जाऊ शकते, अशी कबुली दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून यंदा मतदानासाठी शाईऐवजी मार्करचे किट उपलब्ध करून देण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 2012 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हा मार्कर वापरात असल्याची माहिती देण्यात आली आहे. (Mumbai Voting)
BMC Election 2026 | निवडणूक आयोगाचे निर्णय वादाच्या भोवऱ्यात :
मतदानाच्या दिवशीच निवडणूक आयोगाने घेतलेले काही निर्णय वादग्रस्त ठरत असल्याचे चित्र आहे. यंदा PADU म्हणजेच प्रिंटींग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट नावाचे नवीन मशीन काही वॉर्डमध्ये ईव्हीएमच्या बॅकअपसाठी वापरण्यात येणार आहे. मात्र याबाबतची माहिती शेवटच्या क्षणी देण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
यापूर्वी कधीही PADU मशीन वापरण्यात आले नसताना, अचानक त्याचा वापर का करण्यात आला, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. याशिवाय मतदान सुरू होण्याच्या वेळीच माध्यम प्रतिनिधींना मतदान केंद्रात प्रवेश नाकारण्याचा निर्णय घेण्यात आल्यानेही निवडणूक आयोगावर टीकेची झोड उठली आहे. (BMC Election 2026)
सकाळच्या सत्रातील मतदानाची टक्केवारी :
राज्यातील विविध महानगरपालिकांमध्ये सकाळी 9.30 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत सकाळी 9.30 पर्यंत 6.98 टक्के मतदान नोंदले गेले आहे. पुण्यात पहिल्या दोन तासांत केवळ 5.5 टक्के मतदान झाले आहे. (Election Commission Controversy)
छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळी 7 ते 8 या एका तासात सुमारे 7 ते 8 टक्के मतदान झाले असून, सोलापूरमध्ये सकाळी 7.30 ते 9.30 या वेळेत 6.86 टक्के मतदान नोंदले गेले आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेत 6.45 टक्के, परभणी शहरात 9.10 टक्के, तर मालेगावमध्ये 11.09 टक्के मतदान झाले आहे. अमरावती महानगरपालिकेत सकाळी 7.30 ते 9.30 या कालावधीत 6.6 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.






