ठाकरेंचा मुंबईत ‘मास्टरप्लॅन’! ‘या’ २८ उमेदवारांचे नाव ठरले, एबी फॉर्मही वाटप

On: December 29, 2025 11:44 AM
BMC Election 2026
---Advertisement---

BMC Election 2026 | मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या शिवसेनेकडून मोठी हालचाल सुरू झाली असून, पक्षाने मुंबईतील तब्बल 28 उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. रविवारी रात्रीपासून मातोश्रीवर टप्प्याटप्प्याने एबी फॉर्म वाटपाला सुरुवात करण्यात आली असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्वतः अनेक इच्छुक उमेदवारांना मातोश्रीवर बोलावून त्यांच्या हातात एबी फॉर्म दिले. मात्र यावेळी उमेदवारी निश्चित झालेल्या नेत्यांनाच बोलावण्यात आले होते. काही उमेदवारांना रविवारी रात्री एबी फॉर्म देण्यात आले, तर उर्वरित उमेदवारांना सोमवारी म्हणजेच आज एबी फॉर्म देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, संपूर्ण प्रक्रियेत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे.

मातोश्रीवर एबी फॉर्म वाटप, बंडखोरी टाळण्याचा डाव :

ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली उमेदवार यादी अधिकृत जाहीर होण्याआधीच एबी फॉर्म देऊन उमेदवारी निश्चित करण्याचा हा डाव असल्याचे मानले जात आहे. बंडखोरी टाळण्यासाठी आणि पक्षातील अंतर्गत असंतोष रोखण्यासाठी उमेदवारांना थेट एबी फॉर्म देऊन अर्ज भरण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. (BMC Election 2026)

एबी फॉर्म मिळालेल्या उमेदवारांची नावे जाहीर होऊ नयेत, यासाठी विशेष खबरदारी घेतली जात असून, कोणाला फॉर्म देण्यात आला याची माहिती बाहेर जाऊ नये यासाठी पक्षाकडून कठोर शिस्त पाळली जात आहे. दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली अधिकृत उमेदवार यादी आज जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

BMC Election 2026 | मुंबईतील 28 प्रभागांमध्ये ठरले चेहरे :

मुंबईतील विविध प्रभागांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवार निश्चित केले असून, त्यात प्रभाग क्रमांक 54 मधून अंकित प्रभू, 59 मधून शैलेश फणसे, 60 मधून मेघना विशाल काकडे माने, 61 मधून सेजल दयानंद सावंत, 62 मधून झीशान चंगेज मुलतानी, तर 63 मधून देवेंद्र उर्फ बाळा आंबेरकर यांना संधी देण्यात आली आहे. प्रभाग 64 मधून सबा हारून खान, तर प्रभाग 40 मधून सुहास वाडकर यांचे नाव निश्चित झाले आहे.

याशिवाय प्रभाग 206 मधून सचिन पडवळ, 93 मधून रोहिणी कांबळे, 100 मधून साधना वरस्कर, 156 मधून संजना संतोष कासले, 164 मधून साईनाथ साधू कटके, 168 मधून सुधीर खातू वार्ड, तर 124 मधून सकीना शेख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग 127 मधून स्वरूपा पाटील, 89 मधून गितेश राऊत, 141 मधून विठ्ठल लोकरे, 142 मधून सुनंदा लोकरे, 137 मधून महादेव आंबेकर आणि 138 मधून अर्जुन शिंदे हे उमेदवार असणार आहेत.

तसेच प्रभाग 167 मधून सुवर्णा मोरे, 150 मधून सुप्रदा फातर्फेकर, 95 मधून चंद्रशेखर वायंगणकर, 215 मधून किरण बालसराफ, 218 मधून गीता अहिरेकर, 222 मधून संपत ठाकूर आणि 225 मधून अजिंक्य धात्रक यांना उद्धव ठाकरे गटाकडून संधी देण्यात आल्याची माहिती आहे. या यादीमुळे मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आक्रमक रणनीतीने मैदानात उतरल्याचे स्पष्ट होत आहे.

News Title: BMC Election 2026: Uddhav Thackeray Finalises 28 Candidates in Mumbai, AB Forms Distributed at Matoshree

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now