मुंबई मनपासाठी महायुतीचा ‘मास्टर प्लॅन’ तयार! जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोणाच्या पदरात किती जागा?

On: December 26, 2025 2:14 PM
BMC Election 2026
---Advertisement---

BMC Election 2026 | मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटामध्ये मुंबईतील जागावाटपावरून सुरू असलेल्या चर्चांना अखेर ठोस दिशा मिळाल्याचे चित्र आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी महायुतीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असून यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. (BJP Shiv Sena Seat Sharing)

या नव्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार भाजप मुंबईत 140 जागांवर निवडणूक लढवणार असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 87 जागा देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, महायुतीतील अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस ही मुंबई महापालिका निवडणुकीत स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना मिळून सर्व 227 जागा आपसात वाटून घेणार आहेत. या फॉर्म्युल्यावर अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी राजकीय हालचालींमुळे त्यावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भाजप, शिंदे शिवसेना जागावाटपावर शिक्कामोर्तब कधी? :

यापूर्वी झालेल्या पहिल्या बैठकीत भाजपने शिंदे गटासाठी मुंबईत केवळ 52 जागा सोडण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, राजकीय समीकरणांमध्ये बदल होत गेल्यानंतर आणि ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीच्या चर्चांनंतर भाजपने आपल्या भूमिकेत लवचिकता दाखवल्याचे दिसून आले. त्यानंतर शिवसेनेला अधिक जागा देण्यावर सहमती निर्माण झाली आणि सध्याचा 140-87 चा फॉर्म्युला समोर आला. (Mumbai Municipal Election)

या जागावाटपाच्या पार्श्वभूमीवर भाजपने अद्याप एकाही उमेदवाराची घोषणा केलेली नाही. मुंबईत बंडखोरी टाळण्यासाठी भाजपकडून ‘वेट अँड वॉच’ धोरण अवलंबले जात असल्याची चर्चा आहे. ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर आणि पनवेल या महत्त्वाच्या महापालिकांमध्येही जागावाटपाचा पेच कायम असून येत्या काही दिवसांत तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

BMC Election 2026 | 15 जानेवारीला मतदान, 16 जानेवारीला निकाल

दरम्यान, आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळख असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. मुंबईसह राज्यातील महापालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी व निकाल जाहीर केला जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेतील एकूण 227 प्रभागांसाठी ही निवडणूक होणार आहे.

मुंबई महापालिकेचा कार्यकाळ 7 मार्च 2022 रोजी संपुष्टात आला असून तेव्हापासून महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती आहे. मागील 2017 च्या निवडणुकीत शिवसेना 84 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता, तर भाजपला 82 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि इतर पक्षांचे संख्याबळ मर्यादित होते. आता 2026 च्या निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीचा नवा जागावाटप फॉर्म्युला मुंबईच्या राजकारणाची दिशा ठरवणारा ठरणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

News Title : BMC Election 2026: BJP-Shiv Sena Seat Sharing Formula Finalized for Mumbai

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now