भाजपमध्ये राजकीय भूकंप! ३२ जणांची एकाच वेळी हकालपट्टी

On: January 9, 2026 6:56 PM
BJP
---Advertisement---

BJP | राज्यात सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना भाजपकडून मोठी आणि धक्कादायक कारवाई करण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत झालेल्या बंडखोरीनंतर भाजपने कठोर भूमिका घेत थेट 32 जणांना पक्षातून निलंबित केले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंोंडावर झालेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

निवडणूक प्रचार शिगेला पोहोचलेला असताना अनेक पक्षांना अंतर्गत नाराजीचा सामना करावा लागत आहे. उमेदवारी न मिळाल्याने काही इच्छुकांनी बंडखोरीचा मार्ग स्वीकारल्याचे चित्र समोर आले आहे. नागपूरमध्ये भाजपच्या उमेदवारांविरोधात अपक्ष किंवा इतर पक्षांतून निवडणूक लढवणाऱ्यांवर पक्षाने आता थेट कारवाई केली आहे. (Nagpur Municipal Election 2026)

नागपूरमध्ये भाजपची कठोर शिस्तकारवाई :

नागपूरमध्ये भाजपकडून करण्यात आलेल्या या कारवाईत माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर यांच्यासह एकूण 32 जणांचा समावेश आहे. पक्षविरोधी कारवाया आणि अधिकृत उमेदवारांविरोधात उघडपणे बंडखोरी केल्याचा ठपका ठेवत या सर्वांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईत भाजपचे माजी नगरसेवक सुनील अग्रवाल आणि धीरज चव्हाण यांचाही समावेश आहे.

नागपूर भाजपचे अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी या संदर्भात अधिकृत आदेश काढले आहेत. पक्षाची शिस्त मोडणाऱ्यांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने घेतलेली ही भूमिका अत्यंत निर्णायक मानली जात आहे.

BJP | शिस्तभंग सहन केला जाणार नाही, भाजपचा स्पष्ट इशारा :

या कारवाईवर बोलताना दयाशंकर तिवारी यांनी सांगितले की, काही कार्यकर्ते अपक्ष म्हणून किंवा इतर पक्षांच्या तिकिटावर निवडणूक लढवत असून काही जण त्यांना थेट समर्थन देत होते. त्यामुळे पक्षाची शिस्त आणि संघटनात्मक ताकद टिकवण्यासाठी ही कठोर कारवाई करणे आवश्यक होते, असे त्यांनी स्पष्ट केले. (BJP Suspended Leaders)

भाजप हा अनुशासित पक्ष असून शिस्तभंग अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असा ठाम इशाराही त्यांनी दिला. नागपूरमधील या मोठ्या कारवाईनंतर आता राज्यातील इतर महापालिकांमध्ये बंडखोरी करणाऱ्या नेत्यांवरही अशीच कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र ऐन निवडणुकीत झालेल्या या निर्णयाचा भाजपच्या निवडणूक कामगिरीवर नेमका काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

News Title: BJP Takes Biggest Action Ahead of Elections, 32 Leaders Suspended in Nagpur

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now