BJP vs Shivsena | राज्यातील महापालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अशातच भाजपाने थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला धक्का दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. परंडा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत (Dhananjay Sawant) भाजपसोबत निवडणूक लढवत असल्याने महायुतीतील अंतर्गत राजकारण उघड झाल्याचं चित्र दिसत आहे.
महापालिका निवडणुकांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून अनेक महापालिकांमध्ये शिवसेना शिंदे गटासोबत सत्ता स्थापन करण्यात आली आहे. मात्र आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील समन्वयाला तडा जात असल्याचे संकेत मिळत आहेत. परंडा मतदारसंघातील ही घडामोड एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का मानली जात आहे.
तानाजी सावंत यांना घरातूनच आव्हान :
परंडा मतदारसंघात तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या गटाला जिल्हा परिषदेच्या दोन तर पंचायत समितीच्या चार जागा सोडण्यात आल्या असून स्वतः धनंजय सावंत निजाम जवळा गटातून जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांना घरातूनच आव्हान उभं राहिलं आहे.
तानाजी सावंत यांनी आपल्या पुतण्याला शिवसेनेत रोखण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केल्याची चर्चा होती. मात्र, भाजपने त्यांना उमेदवारी देत थेट मैदानात उतरवल्याने सावंत गटाला मोठा धक्का बसला आहे. महायुतीत असतानाही भाजप आणि शिवसेना शिंदे गट परंड्यात वेगवेगळे लढत असल्याने राजकीय समीकरणे बदलत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
BJP vs Shivsena | ठाकरे गटाची एंट्री, समीकरणे आणखी गुंतागुंतीची :
या घडामोडीत ठाकरे गटाचाही सहभाग दिसून आला आहे. पृथ्वीराज सावंत यांच्यासाठी ठाकरे गटाने जिल्हा परिषद गटातील एक आणि पंचायत समितीतील दोन उमेदवारांचे अर्ज मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे परंडा मतदारसंघात तिढा अधिकच वाढला असून तानाजी सावंत यांची अडचण आणखी गंभीर झाली आहे. (Maharashtra Politics)
या साऱ्या पार्श्वभूमीवर भाजपाने थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला राजकीय धक्का दिल्याची चर्चा सुरू आहे. महापालिकांनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांतही महायुतीतील अंतर्गत संघर्ष उघड होत असल्याने आगामी राजकारणात मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






