Shivsena | राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेनेच्या उमेदवारांचे अधिकृत एबी फॉर्म भाजप नेत्यांकडून वाटप होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी संपर्कप्रमुख राजन साळवी यांना थेट जाब विचारला असून यासंदर्भातील ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. (AB Forms controversy)
कार्यकर्त्यांचा संताप, नेतृत्वावर थेट आरोप :
या व्हायरल ऑडिओमध्ये शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अविनाश खापे आणि संपर्कप्रमुख राजन साळवी यांच्यातील संभाषण ऐकायला मिळत आहे. राणा जगजितसिंह पाटील यांचा मुलगा मल्हार पाटील शिवसेनेच्या उमेदवारांना एबी फॉर्म आणून देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून महायुतीत काहीतरी गंभीर घडत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. (Dharashiv ZP elections)
ऑडिओ क्लिपमध्ये कार्यकर्त्यांची हतबलता आणि संताप स्पष्टपणे दिसून येतो. “दिवसभर आमच्यासोबत बैठका घ्यायच्या आणि रात्री राणा पाटलांसोबत चर्चा करून त्यांचे सुपुत्र आम्हाला एबी फॉर्म वाटतात. आम्हाला आता शिवसैनिक म्हणवून घ्यायला लाज वाटते,” अशा शब्दांत अविनाश खापे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संपर्कप्रमुख असताना भाजपचा हस्तक्षेप का होत आहे, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
Shivsena | धाराशिवच्या बालेकिल्ल्यातच बंडखोरीची शक्यता? :
धाराशिव हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र गेल्या काही महिन्यांत पक्षातील अंतर्गत संघर्ष वाढल्याचे चित्र दिसत आहे.
तसेच काही कार्यकर्त्यांनी “राजकारण सोडून घरी बसण्याची वेळ आली आहे” अशी भावना व्यक्त केल्याने पक्षातील असंतोष अधिक तीव्र झाल्याचे स्पष्ट होते. या घडामोडींचा थेट परिणाम आगामी जिल्हा परिषद निवडणुकीवर होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.






