Maharashtra Politics | राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आता महापौरपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. महापौर आरक्षण सोडत जाहीर झाली असली तरी सत्तावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अशातच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात होणाऱ्या महत्वाच्या बैठकीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या बैठकीत महापौरपदासह इतर प्रमुख पदांवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला असून शिवसेना शिंदे गट दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, अजित पवार गटाला अपेक्षित यश मिळालेले नाही. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर आणि नवी मुंबई महापालिकांवर युतीचाच महापौर (Mayor Decision) होणार असल्याचा दावा भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाकडून केला जात आहे. मुख्यमंत्र्यांचा दावोस दौरा संपल्यानंतर हालचालींना वेग आला असून आजच्या बैठकीत मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे.
मुंबईसह प्रमुख महापालिकांवर लक्ष :
मुंबई महापालिकेत भाजपला 89 जागा मिळाल्या असल्या तरी बहुमतासाठी शिवसेना शिंदे गटाचा पाठिंबा आवश्यक आहे. शिंदे गटाच्या 29 जागा असून सत्तेत मोठा वाटा मिळावा, अशी त्यांची ठाम भूमिका आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर उपमहापौर, स्थायी समिती, सुधार समिती आणि बेस्ट समिती अध्यक्षपदांसाठी शिवसेनेने आग्रह धरल्याची माहिती मिळत आहे.
ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि मीरा-भाईंदरमध्येही सत्तावाटपावरून हालचाली सुरू आहेत. कल्याण-डोंबिवलीत मनसेने शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने समीकरणे बदलली आहेत, तर मीरा-भाईंदरमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत सर्व महापालिकांबाबत एकत्रित निर्णय होण्याची शक्यता आहे.
Maharashtra Politics | आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष :
राज्यातील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यातील आजची बैठक निर्णायक मानली जात आहे.
महापौरपदासोबतच उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्षपद आणि इतर महत्वाच्या पदांवर अंतिम तोडगा निघण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांकडून महापौर हा युतीचाच होणार असल्याचा दावा करण्यात येत असला तरी नेमकी वाटणी कशी होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






