एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटासह काँग्रेसला मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्यांनी केला पक्षप्रवेश

On: December 25, 2025 11:14 AM
Eknath Shinde
---Advertisement---

Eknath Shinde | महाराष्ट्रात सध्या येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने राज्यातील अनेक नेते पक्षांतर करत असल्याचे चित्र दिसत आहे. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत आज मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस तसेच उद्धव ठाकरे गटातील अनेक माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे शिंदे गटाची ताकद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी लक्षणीयरीत्या वाढल्याचे मानले जात आहे. मुंबईत पार पडलेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.

नाशिक-कोल्हापूरमधील नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश :

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात नाशिक महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक व प्रदेश सचिव राहुल अशोक दिवे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यांच्यासोबतच काँग्रेसच्या नगरसेविका आशा तडवी, ॲड. पूजा प्रवीण नवले आणि सुनील बोराडे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. नाशिक जिल्ह्यातील या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर, महेश खांडेकर आणि संभाजी काशीद यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. तसेच राष्ट्रवादी बेस्ट कामगार युनियन सेनेचे अध्यक्ष कृष्णा पाटील आणि उपाध्यक्ष प्रताप गणपत पाटील यांचाही शिवसेनेत समावेश झाला आहे. या सर्व नेत्यांच्या प्रवेशामुळे स्थानिक पातळीवर शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत होणार असल्याचा दावा केला जात आहे.

Eknath Shinde | ठाकरे गट-मनसे युतीवर शिंदेंची घणाघाती टीका :

या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरे गट आणि मनसेच्या संभाव्य युतीवर जोरदार टीका केली. “काही लोक मुंबईकडे सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहतात. आधी अंडी खात होते आणि आता कोंबडीच कापून खाण्यासाठी एकत्र आले आहेत,” असा टोला त्यांनी लगावला. लोकशाहीत युती-आघाड्या होत असतात, मात्र शिवसेना-भाजप युतीने गेल्या साडेतीन वर्षांत महाराष्ट्राच्या विकासासाठी ठोस कामे केल्याचे शिंदे यांनी सांगितले.

पुढे बोलताना त्यांनी मुंबईतील विकासकामांचा उल्लेख केला. क्लस्टर पुनर्विकास, इमारतींना ओसी देणे, पागडीमुक्त मुंबई, रस्त्यांचे काँक्रीटीकरण, मेट्रो प्रकल्प, एसटीपी प्लांट, आरोग्य सुविधा आणि पुनर्विकास योजनांमुळे मुंबईचा चेहरामोहरा बदलल्याचे शिंदे म्हणाले. विरोधकांच्या पत्रकार परिषदेत विकासावर एकही शब्द नव्हता, असा आरोप करत त्यांनी सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी एकत्र येणाऱ्यांवर टीका केली. या कार्यक्रमावेळी मंत्री संजय शिरसाट (sanjay shirsath) , दादाजी भुसे (Dada bhuse) यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

News Title: Big Political Boost for Eknath Shinde’s Shiv Sena as Leaders from Congress and Thackeray Group Join Party

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now