Maharashtra | मुंबईतील राजकीय घडामोडींमध्ये आज मोठा भूकंप झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) मुंबईमध्ये जोरदार धक्का बसला असून पक्षाचे एकमेव माजी नगरसेवक संजय तुर्डे यांनी मनसेला (MNS) रामराम ठोकला आहे. संजय तुर्डे (Sanjay Turde) हे कालिना विभागातून निवडून आले होते आणि गेल्या काही वर्षांपासून मनसेच्या चिन्हावर निष्ठा ठेवून उभे होते.
विशेष म्हणजे, ही घडामोड त्या वेळी घडली आहे, जेव्हा राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील युतीच्या चर्चा राजकीय वर्तुळात तापल्या आहेत. अशा वेळी संजय तुर्डे यांच्यासह कलिना भागातील काही मनसे पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिंदे गटाने ही ‘सर्जिकल स्ट्राईक’ केल्याची राजकीय चर्चा रंगली आहे.
संजय तुर्डे कोण आहेत? :
२०१७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेचे एकूण सात नगरसेवक विजयी झाले होते. त्यापैकी सहा जणांनी कालांतराने शिवसेनेत प्रवेश केला. मात्र संजय तुर्डे हे एकमेव नगरसेवक होते जे अखेरपर्यंत मनसेसोबत राहिले. त्यांचं पक्षत्याग करणं हे मनसेसाठी केवळ धक्का नाही, तर आगामी निवडणुकांआधीची मोठी कमजोरी ठरू शकते.
यापूर्वी दिलीप लांडे, अर्चना भालेराव, हर्षला मारे यांसारख्या नगरसेवकांनीही मनसे सोडून शिवसेनेचा झेंडा हाती घेतला होता. आता संजय तुर्डेंनीही मनसेचा निरोप घेतल्यामुळे मुंबईतील मनसेचं स्थान जवळपास संपल्याचं मानलं जात आहे.
Maharashtra | राज ठाकरे यांची तातडीची बैठक, उद्धव ठाकरे देणार ‘थेट बातमी’? :
या पार्श्वभूमीवर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुंबईतील शिवतीर्थ येथे उपाध्यक्षांची बैठक बोलावली आहे. पक्ष संघटना वाचवण्यासाठी कोणता धोरणात्मक निर्णय घेणार, हे स्पष्ट होणं बाकी आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनी “आता थेट बातमीच देऊ” असं म्हणत राज ठाकरे यांच्याशी युतीच्या संकेतांवर शिक्कामोर्तब केलं आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करावा, असं म्हटल्यावर अवघ्या तासाभरात उद्धव ठाकरेंनी “जे जनतेच्या मनात आहे तेच होईल” असं वक्तव्य करत संभाव्य युतीचं संकेत दिलं. त्यामुळे आगामी महापालिकेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.






