Raj Thackeray News | राज्यातील महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा राजकीय धक्का बसला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सलग दुसऱ्या दिवशी पक्षफुटीचा सामना करावा लागत असून, डोंबिवलीतील अनेक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने मनसेत खळबळ उडाली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घडामोडींमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
डोंबिवली (Dombivli Politics) परिसर हा मनसेचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र या भागातील संघटनात्मक रचनेलाच मोठा हादरा बसल्याने आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंची चिंता वाढली आहे. या पक्षांतराचा थेट परिणाम मतांची गणिते बदलणारा ठरू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
डोंबिवलीत मनसेला मोठा हादरा, भाजपची ताकद वाढली :
महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असताना मनसेच्या अनेक जबाबदार पदाधिकाऱ्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. डोंबिवली उपशहर अध्यक्ष योगेश म्हात्रे, शाखा अध्यक्ष अनिकेत गायकवाड आणि दिपेश धुरी यांच्यासह मनविसे डोंबिवली शहर सचिव चैतन्य सावंत, विभाग सचिव सर्वेश लोंढे (Sarvesh londhe) यांचा यात समावेश आहे. तसेच योगेश पडवळ, निलेश निरकर, अनिकेत सावंत, अभिषेक गायकवाड आणि रोहन वगळ यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
या पक्षप्रवेश कार्यक्रमाला भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी, माजी जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी आणि माजी नगरसेवक मंदार टावरे यांची उपस्थिती होती. या प्रवेशामुळे कल्याण-डोंबिवली भागात भाजपची संघटनात्मक ताकद वाढल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
Raj Thackeray News | सलग दोन दिवस मनसेला धक्के, राजकीय चर्चांना उधाण :
या आधी मुंबईतील मनसेचे नेते संतोष धुरी (Santosh dhuri) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केल्याने मनसेला मोठा धक्का बसला होता. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील युतीमुळे पक्षाचे नुकसान होत असल्याचा आरोप करत संतोष धुरी यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या आरोपांमुळे मनसेच्या अंतर्गत राजकारणावरही प्रश्न उपस्थित झाले होते. (Raj Thackeray News)
संतोष धुरी यांच्यानंतर मनसेचे माजी नगरसेवक आणि सरचिटणीस राजाभाऊ चौगुले यांनी एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्या सोबत मनसेचे प्रवक्ते, विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आणि विविध आघाड्यांतील नेत्यांनीही पक्ष सोडल्याने मनसेसाठी ही परिस्थिती अधिकच आव्हानात्मक ठरत आहे. आता डोंबिवलीतील मोठ्या प्रमाणावरील पक्षप्रवेशामुळे आगामी निवडणुकीत मनसेची रणनीती काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






