महाशिवरात्रीला भीमाशंकर दर्शनाला जाण्याचा प्लॅन करताय? तर ‘ही’ बातमी नक्की वाचा

On: February 9, 2026 11:42 AM
Bhimashankar Temple Closed
---Advertisement---

Bhimashankar Temple Closed | यंदाच्या महाशिवरात्रीला लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर भाविकांसाठी खुले राहणार नाही. पुणे जिल्हा प्रशासनाने 12 ते 18 फेब्रुवारी 2026 या कालावधीत मंदिर पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिर परिसरात सुरू असलेली मोठ्या प्रमाणावरील विकासकामे आणि भाविकांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

विकास आराखड्यामुळे दर्शनास बंदी :

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर (Bhimashankar) येथे सध्या भव्य सभामंडप उभारणीसह विविध पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू आहे. हे काम श्री क्षेत्र भिमाशंकर विकास आराखडा (Shri Kshetra Bhimashankar Development Plan) अंतर्गत करण्यात येत असून, 2027 मध्ये नाशिक (Nashik) येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या वाढत्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी ही व्यवस्था उभारली जात आहे. प्रयागराज (Prayagraj) येथे झालेल्या महाकुंभ 2025 च्या अनुभवावरून, नाशिक-त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) परिसरात येणाऱ्या लाखो भाविकांपैकी मोठ्या संख्येने भाविक भीमाशंकरला भेट देण्याची शक्यता गृहीत धरून हे काम हाती घेण्यात आले आहे.

या आराखड्याअंतर्गत सुरक्षित प्रवेश-निर्गमन व्यवस्था, पायरी मार्ग, गर्दी व्यवस्थापन सुविधा तसेच नवा भव्य सभामंडप उभारण्याचे काम प्रगतिपथावर आहे. जुना सभामंडप गर्दीच्या तुलनेत अपुरा पडत असल्याने तो पूर्णतः उतरविण्यात आला असून त्याच्या जागी नवीन संरचना उभी राहत आहे. मात्र, सध्या मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकाम साहित्य, दगड आणि यंत्रसामग्री ठेवण्यात आलेली असल्याने दर्शनासाठी मंदिर खुले ठेवणे धोकादायक ठरू शकते, असे प्रशासनाचे मत आहे.

Bhimashankar Temple Closed | सुरक्षेचा विचार आणि निर्णयातील बदल :

यापूर्वी प्रशासनाने तीन महिन्यांसाठी मंदिर तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता, मात्र भाविकांची सोय लक्षात घेऊन महाशिवरात्रीचा कालावधी त्यातून वगळण्यात आला होता. तथापि, सध्या सुरू असलेल्या कामांचा वेग, व्याप्ती आणि सुरक्षेच्या जोखमींचा पुनरावलोकन केल्यानंतर महाशिवरात्री दरम्यान मंदिर खुले ठेवणे सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाले. परिसरात मोठ्या प्रमाणावर दगडी बांधकाम सुरू असून साहित्य हटवणे शक्य नसल्यामुळे दर्शनास परवानगी देणे धोक्याचे ठरू शकते, असे प्रशासनाने नमूद केले आहे.

भीमाशंकर हा अतिवृष्टीचा भाग असल्याने जून ते सप्टेंबरदरम्यान येथे मुसळधार पाऊस पडतो आणि त्या काळात बांधकाम करणे अवघड होते. त्यामुळे उपलब्ध कालावधीतच विकासकामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने वेगाने काम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व बाबींचा विचार करून 12 ते 18 फेब्रुवारी 2026 या महाशिवरात्री कालावधीतही मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे, अशी माहिती पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी (Jitendra Dudi) यांनी दिली. तसेच भाविकांनी व स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांना सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

News Title: Bhimashankar Temple Closed on Mahashivratri

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now