सह्याद्रीच्या कुशीत घडली थरकाप उडवणारी घटना; वाचा सविस्तर

On: January 5, 2026 12:20 PM
Pune Trekking News
---Advertisement---

Pune Trekking News | पुणे जिल्ह्यातील ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या मढेघाट परिसरात रविवारी संध्याकाळी घडलेल्या एका घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. सह्याद्रीच्या कुशीत (Sahyadri Trek) निसर्गाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या 50 विद्यार्थ्यांच्या पथकावर अचानक मधमाशांनी भीषण हल्ला केला. काही क्षणांतच शांत डोंगरदऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या किंकाळ्या घुमू लागल्या आणि ट्रेकिंगचा आनंद भयावह प्रसंगात बदलला.

या हल्ल्यात 35 हून अधिक विद्यार्थी आणि त्यांचे प्रशिक्षक जखमी झाले असून, त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर झाली होती. दुर्गम आणि घसरणीच्या भागात ही घटना घडल्याने परिस्थिती आणखी बिकट बनली होती. मात्र, वेळेवर स्थानिक ग्रामस्थांनी दाखवलेल्या धैर्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे चित्र आहे.

मधमाशांचा अचानक हल्ला, घबराटीचे वातावरण :

पुण्यातील एका खासगी साहसी पर्यटन संस्थेमार्फत 50 विद्यार्थ्यांचा हा ट्रेक आयोजित करण्यात आला होता. यामध्ये 14 ते 17 वयोगटातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश होता. मढेघाट ते उपंडा असा हा ट्रेकचा मार्ग असून घाट उतरून मध्यभागी असलेल्या दाट जंगलातून हे पथक जात होते. याच ठिकाणी झाडावर असलेल्या आग्या मोहोळाच्या मधमाशा अचानक उठल्या. (Madheghat Trek)

क्षणातच हजारो मधमाशांनी विद्यार्थ्यांवर हल्ला चढवला. चेहरा, डोळे, ओठ, हात-पायांवर मधमाशांचे असंख्य दंश होऊ लागल्याने विद्यार्थ्यांमध्ये एकच घबराट पसरली. जीव वाचवण्यासाठी अनेक विद्यार्थी डोंगरदऱ्यांत सैरभैर धावू लागले. मात्र, कडेकडेने असलेला घसरणीचा रस्ता आणि दगडधोंडे यामुळे पळताना अनेक जण जखमी झाले.

Pune Trekking News | ग्रामस्थांचे धाडस आणि युद्धपातळीवर उपचार :

घटनेचे गांभीर्य ओळखताच ट्रेक प्रमुखांनी तातडीने स्थानिकांशी संपर्क साधला. तोरण माची हॉटेलचे मालक अभिजित भेके यांनी ही माहिती त्वरित स्थानिक सोशल मीडिया ग्रुपवर शेअर केली. ही बातमी मिळताच केळद गावचे माजी सरपंच रमेश शिंदे आणि स्थानिक तरुणांनी कोणताही विचार न करता जीवाची पर्वा न करता घटनास्थळी धाव घेतली. (Pune Trekking News)

स्थानिक तरुणांनी कड्यामध्ये आणि झाडीत अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढले. 108 रुग्णवाहिका येईपर्यंत ग्रामस्थांनी स्वतःच्या खासगी वाहनांतून जखमी विद्यार्थ्यांना वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यास सुरुवात केली. वेल्हे ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. ज्ञानेश्वर हिरास आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाने युद्धपातळीवर उपचार सुरू केले.

या हल्ल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या, चक्कर येणे, रक्तदाब कमी होणे तसेच दंश झालेल्या ठिकाणी तीव्र वेदना आणि सूज येण्याचा त्रास होत होता. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अंबादास देवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकृती अधिक गंभीर असलेल्या दोन विद्यार्थ्यांना पुण्यातील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात हलवण्यात आले आहे. उर्वरित सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

News Title: Bee Attack on 50 Students During Trek in Madheghat, Pune; Several Injured

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now