BCCI l आयपीएलचा 2025 चा हंगाम 22 मार्चपासून सुरू झाला असून, यंदाच्या हंगामासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) काही महत्त्वाचे नियम बदलले आहेत. त्यामध्ये सर्वात मोठा बदल सुपर ओव्हर संदर्भात करण्यात आला आहे. क्रिकेटप्रेमींना रोमांचाच्या शिखरावर नेणाऱ्या सुपर ओव्हरमध्ये यंदा काही नव्या अटी लागू होणार आहेत, ज्यामुळे सामन्याचा निकाल अधिक स्पष्ट आणि वेळेत लागेल.
आयपीएलमध्ये दोन्ही संघांचे स्कोअर समान झाल्यास सुपर ओव्हर खेळवली जाते. मात्र, अनेकदा एकाहून अधिक सुपर ओव्हर लागतात, आणि यामुळे वेळ लांबतो. त्यामुळे बीसीसीआयने आता स्पष्ट नियम तयार केला आहे की, सामन्याच्या शेवटून पुढे फक्त 60 मिनिटांपर्यंतच सुपर ओव्हर्स खेळवले जातील. जर त्या वेळेतही निर्णय लागला नाही, तर सामना ‘टाय’ मानून दोन्ही संघांना एक-एक गुण दिला जाईल.
सुपर ओव्हरसाठी वेळेचं काटेकोर नियमन :
नवीन नियमानुसार, सामना संपल्यानंतर 10 मिनिटांच्या आत पहिला सुपर ओव्हर सुरू व्हावा लागेल. जर पहिला सुपर ओव्हर टाय झाला, तर दुसरा सुपर ओव्हर फक्त पाच मिनिटांत सुरू करावा लागेल. सामनाधिकारी आणि पंच वेळेवर बारकाईने लक्ष ठेवणार आहेत. जर वेळेत सामन्याचा निकाल लागला नाही, तर वेळ शिल्लक पाहून अतिरिक्त सुपर ओव्हर खेळवला जाईल.
उदाहरणार्थ, जर दोन सुपर ओव्हर्सनंतरही निर्णय झाला नाही आणि 60 मिनिटांत वेळ उरला असेल, तर आणखी एक सुपर ओव्हर होईल. पण वेळ कमी असल्यास, सामना बरोबरीत घोषित केला जाईल.
BCCI l खेळाडूंवर आणि चेंडूंवरही नव्या अटी लागू :
नवीन नियमांनुसार, मागील सुपर ओव्हरमध्ये बाद झालेला फलंदाज पुढच्या सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी करू शकणार नाही. तसेच, गोलंदाजही बदलावा लागेल. म्हणजेच, मागच्या सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी केलेल्या गोलंदाजाला पुन्हा त्या ओव्हरमध्ये चेंडू टाकण्याची परवानगी नसेल.
एकाच सामन्यात एकापेक्षा अधिक सुपर ओव्हर झाल्यास, पहिल्या सुपर ओव्हरमध्ये वापरलेला चेंडूच पुढे वापरण्यात येईल. नवीन चेंडू मिळणार नाही. याशिवाय, जर एखादा फलंदाज दुखापत न होता निवृत्त झाला, तर तो पुन्हा फलंदाजीसाठी येऊ शकणार नाही.
सुपर ओव्हरमध्ये क्षेत्ररक्षणावरही निर्बंध राहतील. सामन्याच्या शेवटच्या षटकात जसे क्षेत्ररक्षणाचे नियम होते, तसेच सुपर ओव्हरमध्ये देखील लागू राहतील.






