Shambhavi Pathak | महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या बारामती विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह दोन अनुभवी वैमानिकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत पायलट-इन-कमांड कॅप्टन सुमित कपूर (Captain Sumit Kapoor) आणि सह-पायलट शांभवी पाठक (Shambhavi Pathak) यांचे प्राण गेले. विमान कंपनीने दोघेही उच्च पात्रता आणि अनुभव असलेले होते, अशी माहिती दिली आहे.
अनुभवी कॅप्टन सुमित कपूर यांची कारकीर्द :
व्हीएसआर एव्हिएशन (VSR Aviation) या कंपनीच्या लियरजेट 45 (Learjet 45) विमानावर कॅप्टन सुमित कपूर (Sumit kapoor) हे पायलट-इन-कमांड म्हणून कार्यरत होते. वरिष्ठ क्रू मेंबर म्हणून उड्डाणातील सर्व महत्त्वाचे निर्णय, लँडिंगची आखणी तसेच आपत्कालीन परिस्थितीत कृती करण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे होती, असे विमान अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. चार्टर विमान उद्योगात त्यांचा मोठा अनुभव होता आणि बिझनेस जेट उडवण्यात त्यांना विशेष प्रावीण्य होते.
विमान क्षेत्रातील मिळालेल्या माहितीनुसार, कॅप्टन कपूर हे अत्यंत शिस्तप्रिय आणि कुशल वैमानिक म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल सहकाऱ्यांमध्ये आदर होता. अपघातग्रस्त विमान 100 टक्के सुरक्षित स्थितीत असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले असून, दोन्ही पायलट अत्यंत अनुभवी असल्याचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. तरीही बारामती विमानतळावर इमर्जन्सी लँडिंगदरम्यान ही दुर्घटना घडली.
Shambhavi Pathak | सह-पायलट शांभवी पाठक यांचा शैक्षणिक व व्यावसायिक प्रवास :
सह-पायलट शांभवी पाठक या प्रशिक्षित आणि पात्र व्यावसायिक वैमानिक होत्या. त्यांनी एअर फोर्स बाल भारती स्कूल (Air Force Bal Bharati School) येथे शिक्षण घेतले आणि 2016 ते 2018 या कालावधीत माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांनी न्यूझीलंड इंटरनॅशनल कमर्शियल पायलट अकादमी (New Zealand International Commercial Pilot Academy) येथे कमर्शियल पायलट आणि फ्लाइट क्रूचे प्रशिक्षण घेतले होते.
मुंबई विद्यापीठ (University of Mumbai) येथून त्यांनी एरोनॉटिक्स, एव्हिएशन आणि एरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी विषयात बॅचलर ऑफ सायन्स पदवी मिळवली होती. त्यानंतर मध्य प्रदेश फ्लाइंग क्लब (Madhya Pradesh Flying Club) येथे सहाय्यक फ्लाइंग इंस्ट्रक्टर म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांच्याकडे फ्लाइट इंस्ट्रक्टर रेटिंग (A) होते आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (Directorate General of Civil Aviation – DGCA) त्यांना फ्रोझन एअरलाइन ट्रान्सपोर्ट पायलट लायसन्स (ATPL) दिले होते. या अपघाताच्या चौकशीसाठी DGCA ने तपास सुरू केला असून, हवामान, दृश्यमानता, विमान संचालन आणि तांत्रिक माहितीचा अभ्यास केला जाणार आहे.






