Bandu Andekar | पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुख्यात गुंड सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नातवाच्या खुनाच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेला बंडू आंदेकर आज पोलीस बंदोबस्तात तुरुंगाबाहेर आला आणि महापालिका निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
फक्त बंडू आंदेकरच नव्हे, तर आंदेकर कुटुंबातील तीन सदस्य यावेळी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर, माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर आणि स्वतः बंडू आंदेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
पोलीस संरक्षणात अर्ज, जेलबाहेरही माज कायम :
न्यायालयाच्या आदेशानुसार आंदेकर कुटुंबाला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विशेष पोलीस एस्कॉर्ट व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
जेलबाहेर येताना बंडू आंदेकरने चेहरा काळ्या कापडाने झाकलेला होता. मात्र व्हॅनमधून उतरताच त्याने हात वर करून ‘व्हिक्टरी साईन’ दाखवला आणि माध्यमांसमोर जोरदार घोषणाबाजी केली. तसेच “नेकी का काम, आंदेकर का नाम” अशी घोषणा देत बंडू आंदेकर अर्ज दाखल करण्यासाठी पुढे गेला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र या वेळी लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांनीही चेहरा स्कार्फने झाकलेला होता.
Bandu Andekar | जामीन नाकारला, पण निवडणूक लढवण्यास परवानगी :
महत्त्वाचं म्हणजे न्यायालयाने आंदेकर कुटुंबाला निवडणूक लढवण्याची परवानगी दिली असली, तरी लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांचे जामीन अर्ज फेटाळले आहेत. त्यामुळे सध्या तिघांनाही न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे. (Bandu Andekar)
जामीन नाकारण्यात आल्याने अडचणी वाढल्या असल्या तरी, निवडणूक लढवण्याचा घटनात्मक अधिकार अबाधित ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आंदेकर कुटुंब ही निवडणूक थेट जेलमधूनच लढवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
कोणत्या पक्षाकडून निवडणूक? उत्सुकता कायम :
आंदेकर कुटुंबाने उमेदवारी अर्ज दाखल केला असला, तरी ते कोणत्या राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवणार याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आगामी काळात प्रचार कसा केला जाणार, मतदारांचा प्रतिसाद काय असेल आणि राजकीय समीकरणांवर याचा काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






