Baliraja Free Power Scheme | मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना (CM Baliraja Free Power Scheme) शेतकऱ्यांसाठी सुरूच राहणार आहे, याबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी महावितरणकडे वर्ग करण्यात आला असून, लाखो शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळणार आहे.
मोफत वीज योजनेसाठी मोठ्या निधीची तरतूद
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना (CM Baliraja Free Electricity Scheme) बंद होणार असल्याच्या अफवांना सरकारने पूर्णविराम दिला आहे. महावितरणकडे (MahaVitaran) एका दिवसात तब्बल दोन मोठे निधी वर्ग करण्यात आले आहेत. पहिला निधी 2 हजार 26 कोटी रुपयांचा आणि दुसरा निधी 1 हजार 800 कोटी रुपयांचा असून, दोन्ही मिळून एकूण 3 हजार 826 कोटी रुपये सरकारने वितरित केले आहेत.
या योजनेचा लाभ 7.5 अश्वशक्ती (HP) पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मिळणार असून, यांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाणार आहे. सरकारने एप्रिल 2024 ते मार्च 2029 या कालावधीसाठी योजना सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. याआधी या योजनेबाबत विरोधकांनी ती रद्द करण्याचे आरोप केले होते. मात्र, सध्याच्या निधी वाटपातून ही योजना बंद होणार नसल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
अजित पवार यांनी केली होती योजनेची घोषणा
या योजनेची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी 28 जून 2024 रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात केली होती. हवामानातील बदलामुळे शेती अडचणीत सापडत असल्याने, वीजबिलाचा बोजा कमी करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. राज्यात सध्या एकूण 47.41 लाख कृषी पंप ग्राहक असून, त्यातील 44 लाख 3 हजार पंप हे 7.5 HP किंवा त्यापेक्षा कमी क्षमतेचे आहेत. या सर्व शेतकऱ्यांना योजना लागू होणार आहे.
या योजनेसाठी सरकारने पुढील पाच वर्षांसाठी 14 हजार 760 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. एप्रिल 2024 पासून योजना राबवली जाणार असून, 2029 पर्यंत सुरू राहील. त्यानंतर आणखी तीन वर्षांसाठी ही योजना वाढवण्याबाबत सरकार विचार करणार आहे.
Title : Baliraja Free Power Scheme to Continue






