“आमदार, खासदार, मंत्र्यांच्या घरात बिबट्या शिरला पाहिजे”, बच्चू कडू प्रचंड संतापले

On: December 11, 2025 4:03 PM
Bachchu Kadu
---Advertisement---

Bachchu Kadu | राज्यात बिबट्यांच्या वाढत्या हालचालींमुळे अनेक नागरिक घाबरले आहेत. अशातच प्रहारचे नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. विदर्भातील जनतेच्या समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्‍न आणि वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांवरून त्यांनी सरकारला थेट जबाबदार ठरवत संताप व्यक्त केला. “हजार बिबट्यांचा बंदोबस्त करू शकत नाही, जाऊ तिथं खाऊ असं सरकार आहे,” अशा शब्दांत त्यांनी राज्य सरकारवर तोफ डागली. यावेळी त्यांनी मंत्री, आमदार आणि खासदारांवरही कठोर शब्दांत निशाणा साधला.

कडू यांनी स्पष्टपणे म्हटले की, “जोपर्यंत बिबट्या एखाद्या आमदार-खासदाराच्या घरात शिरत नाही, तोपर्यंत शासनाला परिस्थितीची गंभीरता समजत नाही.” बिबट्यांच्या हालचालीमुळे ग्रामीण भागात दहशत पसरलेली असताना प्रशासनाकडून योग्य उपाययोजना होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच वनविभागाकडून करण्यात येणाऱ्या कारवाईवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. (Leopard Attacks)

शेतकऱ्यांची दयनीय अवस्था, कर्जमाफीची ठाम मागणी :

बच्चू कडू यांनी त्यांच्या विधानात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रश्नांवरूनही टीका केली. चालू वर्षी झालेल्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या उध्वस्त झाला आहे. “मरणारा शेतकरी हिंदू नाही का?” असा सवाल करत त्यांनी सरकारकडे कर्जमाफीची तातडीची मागणी केली. कर्जमाफीची प्रक्रिया योग्यरित्या न झाल्यास विदर्भात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात रेल्वे थांबवण्याचा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी त्यांनी प्रवीण परदेशी आणि रवी राणा यांच्यावरही टीका केली. परदेशी हे देशातले आहेत की परदेशातले, याची चौकशी करा, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला. रवी राणा यांच्या विधानाचा संदर्भ देत त्यांनी म्हटले, “असे पाळणारे भरपूर आहेत…तुम्ही किल्ले उडवण्यात दंग आहात, पण इथे शेतकरी रोज मरतोय.”

Bachchu Kadu | ईव्हीएमवरील गंभीर आरोप आणि महायुतीतील तणावावर भाष्य :

ईव्हीएम मशीनवरही कडू (Bachchu Kadu) यांनी धडाकेबाज आरोप केले. “15 ते 20 टक्के ईव्हीएममध्ये घोळ आहे,” असा दावा करत त्यांनी बॅलेट पेपरकडे परतण्याची मागणी केली. “रामभक्त असाल तर बॅलेटवर या,” असा टोलाही त्यांनी सत्ताधारी पक्षांना दिला. त्यांच्या मते, मतदान प्रक्रिया पारदर्शक असावी आणि तिच्याशी छेडछाड होऊ नये यासाठी बॅलेटच एकमेव मार्ग आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर कडू यांनी तीक्ष्ण प्रतिक्रिया दिली. “दोन्ही पक्ष एकत्र येऊन काय भलं होणार शेतकऱ्याचं? ते सत्तेसाठी एकत्र येतात; शेतकऱ्यांसाठी नाही,” असे ते म्हणाले. शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वावरही त्यांनी थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

News Title: Bachchu Kadu Slams Maharashtra Government Over Leopard Issue, Farmers’ Crisis and EVM Allegations

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now