Bacchu Kadu | प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस असून त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यांचे वजन तब्बल ४ किलोने कमी झाले असून, रक्तदाबात वाढ झाल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे. तरीही बच्चू कडूंनी आपलं आंदोलन थांबवण्यास नकार दिला आहे.
शेतकरी, दिव्यांग, विधवा महिलांच्या न्यायहक्कासाठी सुरु असलेल्या या आंदोलनाला आता राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असून, अनेक राजकीय नेते व कार्यकर्ते बच्चू कडूंना पाठिंबा दर्शवत आहेत.
“आम्ही जिवंत आहोत हे सांगायला आलो आहोत” – बच्चू कडू :
बच्चू कडूंनी (Bacchu Kadu) पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “हे आंदोलन आमच्या अस्तित्वासाठी आहे. जाती-धर्माने विभागलेला शेतकरीही शेवटी शेतकरीच असतो. त्याचंही जगणं महत्त्वाचं आहे. सरकारने सध्याच्या स्थितीची जाणीव घ्यावी. शेतमालाचे दर कोसळले आहेत. आम्ही मंत्री असतानाही शेतकऱ्यांचा आवाज उठवला आणि आजही त्यांच्यासाठी लढतोय. आम्ही मरण पत्करू, पण झुकणार नाही.”
बावनकुळे यांच्या ‘दमदाटी’विरोधातही कडूंनी आवाज उठवला. ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. मंदिरात पुण्य मिळवले असेल, पण आत्महत्येचं पाप कुठं फेडणार?”
Bacchu Kadu | शरद पवारांचा संपर्क, मनोज जरांगे भेट घेणार :
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad pawar) यांनी बच्चू कडूंना फोन करून त्यांची विचारपूस केली. नितेश कराळे मास्तरांच्या मध्यस्थीने दोघांमध्ये संवाद घडून आला. शरद पवारांनी कडूंना आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला. दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे देखील आज बच्चू कडूंना (Bacchu Kadu) भेट देणार आहेत.
राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेसह विविध पक्षांचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते देखील आंदोलनस्थळी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आंदोलनाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे.






