Maharashtra Politics | अंबरनाथ नगरपालिकेतून काँग्रेससाठी मोठी आणि धक्कादायक राजकीय घडामोड समोर आली आहे. नव्याने निवडून आलेल्या काँग्रेस पक्षाच्या तब्बल 11 नगरसेवकांनी एकत्रितपणे भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. या घडामोडीमुळे काँग्रेस पक्षाची अंबरनाथमधील ताकद जवळपास संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. (Ambernath Congress News)
अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात विकासाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेली जवळीक आधीच चर्चेचा विषय ठरली होती. नगरपालिका निवडणुकीनंतर काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपप्रणीत विकास आघाडीला पाठिंबा दिला होता. मात्र या निर्णयावर काँग्रेस प्रदेश नेतृत्वाने तीव्र नाराजी व्यक्त करत थेट कारवाईचा पवित्रा घेतला.
हर्षवर्धन सपकाळ यांची कठोर कारवाई; काँग्रेसमधून निलंबन :
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अंबरनाथमधील भाजप-काँग्रेस युतीचा मुद्दा गंभीरपणे घेतला. पक्षाला कोणतीही पूर्वकल्पना न देता भाजपसोबत गटबंधन केल्याचा ठपका ठेवत, अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्षासह सर्व काँग्रेस नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या संदर्भातील अधिकृत पत्र वरिष्ठ काँग्रेस नेते गणेश पाटील यांनी पाठवले होते.
या कारवाईनंतर काँग्रेसमध्ये असंतोषाची लाट उसळली. निलंबनाच्या निर्णयामुळे नाराज झालेल्या नगरसेवकांनी अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. अवघ्या दुसऱ्याच दिवशी 11 नवनिर्वाचित नगरसेवकांनी भाजपमध्ये सामूहिक प्रवेश करण्याची घोषणा केली, ही बाब काँग्रेससाठी मोठा धक्का मानली जात आहे. (11 Corporators Join BJP)
Maharashtra Politics | भाजपमध्ये प्रवेशाची तयारी; काँग्रेसचा प्रतिहल्ला :
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra chavan) यांच्या उपस्थितीत नवी मुंबई येथे हा पक्षप्रवेश होणार आहे. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये प्रदीप नाना पाटील, दर्शना उमेश पाटील, अर्चना चरण पाटील, हर्षदा पंकज पाटील, तेजस्विनी मिलिंद पाटील, विपुल प्रदीप पाटील, मनीष म्हात्रे, धनलक्ष्मी जयशंकर, संजवणी राहुल देवडे, दिनेश गायकवाड, किरण बद्रीनाथ राठोड आणि कबीर नरेश गायकवाड यांचा समावेश आहे. काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले हे नगरसेवक आता भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत. (11 Corporators Join BJP)
दरम्यान, या घडामोडींवर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपवर जोरदार टीका करत, भाजपने आपल्या नगरसेवकांवर कोणतीही कारवाई का केली नाही असा सवाल उपस्थित केला आहे. सत्तेसाठी भाजप तत्व, नीतीमत्ता आणि विचार बाजूला ठेवत असल्याचा आरोप त्यांनी केला असून, भाजप आणि इतर पक्षांमधील कथित जवळीकही त्यांनी यावेळी अधोरेखित केली आहे. (Maharashtra Politics)
अंबरनाथमधील ही राजकीय उलथापालथ आगामी स्थानिक राजकारणावर मोठा प्रभाव टाकणारी ठरणार असून, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.






