Ajit Pawar l धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना वाल्मिक कराड प्रकरणामुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात सामावून घेण्याची मागणी जोर धरत आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी थेट प्रतिक्रिया दिली आहे आणि याबाबत सध्या काय स्थिती आहे, हे स्पष्ट केलं आहे.
मुंडेंच्या पुनरागमनावर अजित पवारांचं उत्तर:
पिंपरीत आयोजित एका कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर अजित पवार माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळात पुनरागमनाबाबत प्रश्न विचारल्यावर त्यांनी म्हटलं, “कोणी काय म्हणावं, उद्या तुम्हाला मंत्री करा असं म्हणतील! सध्या त्या प्रकरणात सीआयडी चौकशी सुरु आहे, पोलिस तपास चालू आहे, तसेच एसआयटीची नेमणूकही झाली आहे.”
अजित पवारांनी स्पष्टपणे सांगितलं की, चौकशीचा अहवाल आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून बसून निर्णय घेतील. त्यामुळे मुंडेंच्या मंत्रिमंडळातील पुनरागमनाबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. यावर निर्णय चौकशीच्या निष्कर्षावर अवलंबून असेल.
Ajit Pawar l मराठी भाषा, हिंदी सक्तीवरूनही अजितदादांची परखड मते :
या संवादादरम्यान अजित पवारांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावरही ठाम भूमिका मांडली. त्यांनी सांगितलं की, मराठी ही आपली मातृभाषा असून तिच्या टिकावासाठी प्रेम, आपुलकी आवश्यक आहे. त्यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी कौतुक केलं. मराठी भाषा नव्या पिढीला यायलाच हवी, असं ते म्हणाले.
हिंदी सक्तीच्या मुद्यावर विरोधकांनी सुरू केलेल्या टीकेवर बोलताना त्यांनी विरोधकांकडे विरोध करण्यासाठी आता काही मुद्दे उरले नाहीत, असा टोला लगावला. मराठी टिकवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून हिंदीसाठी सक्ती नाही, हे स्पष्ट केलं.






