अजित पवारांचा शेवटचा कॉल व्हायरल; कार्यकर्त्याचा मोठा खुलासा

On: February 4, 2026 11:31 AM
Ajit Pawar News
---Advertisement---

Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाती निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या विमान अपघाताबाबत विविध तर्कवितर्क सुरू असतानाच आता बारामतीतून एक भावनिक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. या क्लिपमध्ये अपघाताच्या काही मिनिटे आधीचा अजितदादांचा शेवटचा फोन कॉल ऐकायला मिळत असून, त्यामुळे पुन्हा एकदा राज्यभरात हळहळ व्यक्त होत आहे.

अपघाताआधीचा शेवटचा संवाद :

श्रीजीत पवार (Shrijeet Pawar) यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, २८ जानेवारी रोजी सकाळी ८:१९ वाजता त्यांनी अजितदादांना एका विषयावर मेसेज पाठवला होता. त्यानंतर मुंबईहून बारामतीकडे येणाऱ्या विमानाला नेटवर्क मिळताच अजित पवार यांनी स्वतःहून ८:३७ वाजता श्रीजीत यांना फोन केला. विशेष म्हणजे, ज्या विमानाचा अपघात सकाळी ८:४६ वाजता झाला, त्याच प्रवासात हा संवाद घडला होता.

या कॉलचे रेकॉर्डिंग आता सार्वजनिक झाले असून, मृत्यूच्या अवघ्या नऊ मिनिटे आधी दादांनी काय बोलले होते, हे ऐकताना उपस्थित पत्रकारांचेही डोळे पाणावले. त्या संवादातून त्यांच्या शांत, संयमी आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याच्या भूमिकेचे दर्शन घडते, असे श्रीजीत पवार यांनी सांगितले आहे.

Ajit Pawar | न्याय, समतेचा संदेश आणि दुर्दैवी अंत :

रेकॉर्डिंगमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवारीवर चर्चा होत असल्याचे ऐकू येते. अजित पवार म्हणतात की, सर्व जाती-धर्मातील लोकांना एकत्र घेऊन पुढे जाणे हेच आपले ध्येय आहे आणि प्रत्येक घटकाला न्याय मिळायला हवा. इतर पक्षांनी माळी समाजाला जिल्हा परिषद उमेदवारी दिली नसताना आपण ती दिली आहे, असेही त्यांनी या संभाषणात स्पष्ट केले आहे. शेवटच्या श्वासापर्यंत सामाजिक समतेची भूमिका घेणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा या शब्दांतून पुन्हा अधोरेखित होत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

तसेच ८:३७ वाजता फोन संपल्यानंतर अवघ्या नऊ मिनिटांत बारामती विमानतळावर (Baramati Airport) लँडिंगच्या वेळी विमानाला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. जमिनीवर उतरण्यापूर्वी काही मिनिटे ते आपल्या कार्यकर्त्याशी समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याबाबत चर्चा करत होते, हे समजताच संपूर्ण महाराष्ट्राचा कंठ दाटून आला आहे.

याशिवाय २९ जानेवारी रोजी विद्या प्रतिष्ठान, बारामती (Vidya Pratishthan, Baramati) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले होते. मात्र, ४ फेब्रुवारीला श्रीजीत पवार यांनी समोर आणलेल्या या ऑडिओ क्लिपमुळे अजितदादांच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या असून, ‘शेवटच्या क्षणापर्यंत जनसेवेचा विचार करणारा नेता’ अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

News Title: Ajit Pawar Last Call Audio

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now