अजित पवारांना निरोप! आज बारामतीत अंत्यसंस्कार होणार, जाणून घ्या वेळ आणि ठिकाण

On: January 29, 2026 9:14 AM
Ajit Pawar
---Advertisement---

Ajit Pawar Funeral | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून बारामतीसह राज्यभरातून शोकसंदेश व्यक्त केले जात आहेत. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो नागरिक आज बारामतीकडे रवाना झाले आहेत.

सहयोग निवासस्थान ते काटेवाडी आणि त्यानंतर बारामतीपर्यंत अजित पवार यांच्या पार्थिवाच्या प्रवासादरम्यान सर्वत्र भावनिक वातावरण पाहायला मिळत आहे. शहरात ठिकठिकाणी श्रद्धांजली फलक, बॅनर्स लावण्यात आले असून नागरिक डोळ्यात अश्रू घेऊन आपल्या नेत्याच्या आठवणींना उजाळा देत आहेत.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार :

अजित पवार यांचे पार्थिव काल रात्री त्यांच्या सहयोग निवासस्थानी ठेवण्यात आले होते. त्यानंतर पहाटे ते त्यांच्या मूळ गावी काटेवाडी येथे नेण्यात आले, जिथे सकाळी ६ ते ९ या वेळेत नागरिकांसाठी अंतिम दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मोठ्या संख्येने समर्थक आणि कार्यकर्ते तेथे दाखल झाले असून वातावरण अत्यंत भावनिक झाले आहे. (Ajit Pawar Funeral)

सकाळी ९ वाजता काटेवाडी येथून पार्थिव रुग्णवाहिकेतून ग. दि. मा. सभागृह येथे आणण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता ग. दि. मा. सभागृह ते विद्या प्रतिष्ठान मैदान या मार्गावर अंत्ययात्रा काढण्यात येईल. सकाळी ११ वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.

Ajit Pawar Funeral | व्हीव्हीआयपी लोक उपस्थिती राहणार :

या अंत्यविधीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्र व राज्यातील अनेक प्रमुख नेते बारामतीत दाखल होत आहेत. त्यामुळे शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असून वाहतुकीतही मोठे बदल करण्यात आले आहेत. बारामती विमानतळावर पोलिसांसह विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.

अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर आणि पुणे बाजार समितीत व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पुकारला आहे. नाशिक बाजार समितीतील सर्व व्यवहार आणि लिलावही आज बंद ठेवण्यात आले आहेत. संपूर्ण राज्यभरातून नागरिक, सामाजिक संस्था आणि विविध संघटनांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

दरम्यान, या भीषण विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी प्राथमिक स्वरूपात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, उच्च पदस्थ व्यक्तीच्या अपघाती मृत्यूचा विचार करता या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दुर्घटनेने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली असून अजित पवार यांचे कार्य आणि नेतृत्व कायम स्मरणात राहील, अशी भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

News Title: Ajit Pawar Funeral: State Farewell in Baramati, Timing, Location and Full Schedule

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now