Ajit Pawar | राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे राज्यभरात राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला असून अनेक पक्षांमध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. काही इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरीचे सूर उमटत असतानाच, काही नेत्यांनी थेट पक्षांतर किंवा राजीनाम्याचा मार्ग स्वीकारला आहे.
अशाच घडामोडींमध्ये जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे जळगाव महानगराध्यक्ष अभिषेक पाटील (Abhishekh patil) यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हा राजीनामा अत्यंत निर्णायक क्षणी दिला गेल्याने पक्षासाठी ही मोठी अडचण मानली जात आहे.
जागावाटपावरून मतभेद, अंतर्गत वाद उघड :
महानगरपालिका निवडणुकीतील जागावाटपावरून जिल्हाध्यक्ष संजय पवार (Sanjay Pawar) आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्याशी मतभेद झाल्याने अभिषेक पाटील यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून पक्षातील दुफळी स्पष्टपणे दिसून येत आहे.
अजित पवार (Ajit Pawar) गटातील महत्त्वाचा चेहरा असलेल्या पाटील यांच्या राजीनाम्यामुळे जळगावमधील राष्ट्रवादीच्या संघटनात्मक ताकदीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणुकीच्या तोंडावरच पक्षातील नेतृत्वात अस्थिरता निर्माण झाल्याने आगामी निकालांवर याचा थेट परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Ajit Pawar | समजूत काढण्याचे प्रयत्न, महायुतीची घोषणा :
दरम्यान, अभिषेक पाटील यांच्या नाराजीवर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. पाटील यांच्या आई तसेच अजित पवार गटाच्या महिला पदाधिकारी कल्पनाबाई पाटील यांच्याशी चर्चा करून समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्हाध्यक्ष संजय पवार, माजी मंत्री गुलाबराव देवकर (Gulabrao Deokar) आणि माजी आमदार मनीष जैन(Manish Jain) हे नेते त्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
याचवेळी जळगाव महानगरपालिकेसाठी महायुतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगावमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सहा जागा मिळणार असून उर्वरित जागांवर शिवसेना आणि भाजप उमेदवार उभे राहणार आहेत. मात्र, अभिषेक पाटील यांच्या राजीनाम्यानंतर ही महायुती कितपत सावरते, याकडे संपूर्ण राजकीय महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.






