Ajit Pawar Plane Black Box | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान दुर्घटनेनंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. बारामतीजवळ घडलेल्या या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. आता या दुर्घटनेतील महत्त्वाचा ब्लॅक बॉक्स सापडल्यामुळे अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बारामती दुर्घटनेतील महत्त्वाचा टप्पा :
मुंबईहून बारामतीकडे येत असताना अजित पवार यांचं विमान लँडिंगच्या टप्प्यावर कोसळलं. या भीषण अपघातात विमानातील सर्व प्रवासी मृत्युमुखी पडले. दुर्घटनेनंतर तपास यंत्रणांनी विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधण्यासाठी मोहीम हाती घेतली होती. अखेर हा ब्लॅक बॉक्स सापडल्याची माहिती समोर आली आहे. या उपकरणाच्या मदतीने अपघातामागील नेमकी कारणं समजून घेण्यास तपास यंत्रणांना मदत होणार आहे. (Ajit Pawar Plane Black Box)
बारामतीजवळ अपघातग्रस्त झालेलं लिअरजेट 45 (Learjet 45) हे विमान कठोर सुरक्षा निकषांनुसार तयार करण्यात आलेलं आहे. या विमानामध्ये फ्लाइट डेटा रेकॉर्डर (Flight Data Recorder – FDR) आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (Cockpit Voice Recorder – CVR) हे दोन्ही घटक असतात, ज्यांना एकत्रितपणे “ब्लॅक बॉक्स” असं संबोधलं जातं. नाव जरी ब्लॅक बॉक्स असलं तरी त्याचा रंग प्रत्यक्षात नारंगी असतो, जेणेकरून तो ढिगाऱ्यात, जंगलात किंवा कचऱ्यात सहज ओळखता येईल.
Ajit Pawar Plane Black Box | अपघाताचं कारण लवकरच स्पष्ट होणार :
ब्लॅक बॉक्स अशा प्रकारे डिझाइन केलेला असतो की तो स्फोट, तीव्र आग, उच्च तापमान, पाणी किंवा जबर धक्क्यांनंतरही सुरक्षित राहतो. या उपकरणात विमानाच्या प्रत्येक हालचाली, वेग, उंची तसेच कॉकपिटमधील संभाषणांची नोंद संग्रहित केली जाते. त्यामुळे अपघात नेमका कशामुळे झाला, मानवी चूक होती की तांत्रिक बिघाड, हे निष्पन्न करण्यात तपास यंत्रणांना याचा मोठा आधार मिळणार आहे. (Ajit Pawar Plane Black Box)
प्राथमिक माहितीनुसार, हे विमान धावपट्टीच्या उंबरठ्यावर पोहोचण्याआधीच कोसळलं आणि जमिनीवर आदळताच मोठा स्फोट होऊन आग लागली. या दुर्घटनेत पाचही प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणाचा तपास सुरू असून, ब्लॅक बॉक्स हाती लागल्यामुळे या चौकशीला वेग येण्याची शक्यता आहे.






