Manikrao Kokate Resignation | महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत अखेर अधिकृत वाढ झाली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटेंचा राजीनामा स्वीकारल्याची घोषणा केली आहे. न्यायालयाच्या निकालानंतर माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला होता. हा राजीनामा तत्त्वतः स्वीकारत पुढील संवैधानिक प्रक्रियेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. (Manikrao Kokate Resignation)
अजित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती जाहीर केली. कायदा आणि नियम हे कोणत्याही व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ आहेत, या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीर्घकालीन भूमिकेनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याला मंजुरी दिल्यानंतर माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद अधिकृतपणे संपुष्टात येणार आहे.
अजित पवारांची भूमिका काय? :
अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले की, सार्वजनिक जीवन हे संविधानिक नैतिकता, संस्थात्मक प्रामाणिकता आणि न्यायपालिकेच्या सन्मानावर आधारित असले पाहिजे. कायदेशीर प्रक्रियेवर आमचा पूर्ण विश्वास असून, राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे काटेकोर पालन होईल, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. लोकशाही मूल्ये जपली जातील आणि जनतेच्या विश्वासाला कुठलाही तडा जाणार नाही, याच भूमिकेतून हा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांना पत्र पाठवून माणिकराव कोकाटे यांच्याकडील खात्यांची जबाबदारी तात्पुरती अजित पवार यांच्याकडे देण्याची शिफारस केली होती. राज्यपालांनी त्या पत्राला मंजुरी दिल्यामुळे माणिकराव कोकाटे हे कालपासून बिनखात्याचे मंत्री झाले होते. आज राजीनामा स्वीकारल्याने या प्रकरणावर शिक्कामोर्तब झाले आहे.
Manikrao Kokate Resignation | कोणत्या प्रकरणामुळे कोकाटे अडचणीत? :
माणिकराव कोकाटे यांच्यावर 1995 मधील शासकीय सदनिका गैरव्यवहाराचा आरोप आहे. नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर परिसरात असलेल्या ‘मॉर्निंग व्ह्यू अपार्टमेंट’मध्ये त्यांनी कमी उत्पन्न दाखवून अल्प उत्पन्न गटातील सदनिका मिळवल्याचा आरोप आहे. या प्रकरणात कोकाटे यांच्यासह त्यांचे बंधू विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने यांचा समावेश आहे. (Manikrao Kokate Resignation)
फेब्रुवारी 2025 मध्ये नाशिक जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांनी नाशिक सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. मात्र सत्र न्यायालयानेही जिल्हा न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. यानंतर माणिकराव कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून, तिथे अद्याप सुनावणी प्रलंबित आहे.
दरम्यान, न्यायालयाच्या निकालानंतर वाढलेल्या राजकीय दबावामुळे अखेर माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून, अजित पवार यांनी तो स्वीकारल्याने राज्याच्या राजकारणात नवा वळणबिंदू निर्माण झाला आहे.






