Yugendra Pawar Video | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघातात झालेल्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण राज्य हादरून गेलं आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी ते बारामती दौऱ्यावर होते. मात्र बारामती विमानतळावर (Baramati Airport) लँडिंग दरम्यान त्यांच्या विमानाला भीषण अपघात झाला आणि या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर बारामतीत शोककळा पसरली असून संपूर्ण महाराष्ट्रातून भावनिक प्रतिक्रिया येत आहेत.
या धक्कादायक बातमीने पवार कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. अजित पवार यांच्या निधनाची माहिती समजताच नातेवाईक, समर्थक आणि पक्ष कार्यकर्ते भावूक झाले असून अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आहेत. या दरम्यान अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार (Yugendra Pawar Video) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात ते फोनवर बोलताना रडताना दिसत आहेत.
युगेंद्र पवारांचा भावूक क्षण :
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये युगेंद्र पवार ‘दादा गेले’ असे म्हणत अश्रूंना वाट मोकळी करून देताना दिसत आहेत. हॉस्पिटल परिसरात घडलेला हा क्षण पाहून अनेकांचे मन हेलावून गेलं आहे. अजित पवार यांच्याशी असलेलं त्यांचं भावनिक नातं आणि आपुलकी या दृश्यातून स्पष्टपणे जाणवत आहे.
View this post on Instagram
युगेंद्र पवार यांच्यासह पवार कुटुंबातील इतर सदस्यांनाही हा धक्का पचवणं कठीण जात असल्याचं पाहायला मिळत आहे. समर्थक आणि कार्यकर्ते हॉस्पिटल परिसरात मोठ्या संख्येने जमले असून संपूर्ण वातावरण शोकमग्न झालं आहे.
Yugendra Pawar Video | पक्ष नेत्यांनाही अश्रू अनावर :
या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांना अश्रू अनावर झाले. अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी हेही भावूक झाले असून ते तातडीने बारामतीकडे रवाना झाल्याची माहिती आहे. हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनीही स्वतःला सावरू न शकता “ज्यांच्या जीवावर आम्ही राजकारण केलं, तेच दादा आम्हाला सोडून गेले,” अशा शब्दांत दुःख व्यक्त केलं आहे.
दरम्यान, अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून प्रशासनाकडून अधिकृत माहिती देण्यात येत आहे. अजित पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांची नेतृत्वशैली, निर्णयक्षमता आणि जनतेशी असलेली नाळ कायम स्मरणात राहील, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.






