Recharge Hike | देशातील प्रमुख टेलिकॉम कंपन्यांच्या रिचार्ज दरांमध्ये पुन्हा वाढ होण्याची चर्चा जोरदार सुरू झाली आहे. Airtel, Jio आणि Vi या तिन्ही कंपन्या डिसेंबरच्या अखेरीस किंवा नव्या वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅनच्या किंमतीत 10 ते 12 टक्क्यांची वाढ करू शकतात, असा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. तसेच अनेक पेमेंट अॅप्स युजर्सना पाठवत असलेल्या नोटिफिकेशनमुळे या चर्चेला आणखी वेग आला आहे. मात्र, तिन्ही कंपन्यांकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टनुसार, काही पेमेंट अॅप्स डिसेंबरपासून रिचार्ज महागणार असल्याचे सूचित करत आहेत. त्यात “1 डिसेंबरपासून रिचार्ज रेट वाढतील, आता जुन्या दरात रिचार्ज करा” अशा प्रकारच्या अलर्टची चर्चा आहे. अनेक युजर्सनी हे नोटिफिकेशन पाहिल्याचे सांगत सोशल मीडियावर स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. यामुळे ग्राहकांमध्ये अनिश्चितता वाढली असून, दरवाढीची शक्यता अधिक असल्याचे मानले जात आहे. (Mobile Recharge Hike)
दर वाढीमागील कारणं काय? :
टेलिकॉम क्षेत्रातील तज्ञांच्या मते, गेल्या काही महिन्यांपासून कंपन्यांचा ऑपरेशनल खर्च वाढला आहे. विशेषत: 5G नेटवर्कचा विस्तार, देखभाल खर्च, स्पेक्ट्रम शुल्क आणि वाढती स्पर्धा यामुळे कंपन्यांना अधिक महसुलाची गरज आहे. त्यामुळे प्लॅन महाग करण्याची शक्यता नाकारता येत नाही. Airtel आणि Jio यांनी यापूर्वी काही कमी किमतीचे डेटा पॅक हटवल्याने किंमतवाढीचा प्राथमिक संकेत मिळाला आहे.
दरम्यान, पेमेंट अॅप्सद्वारे पाठवले जाणारे अलर्ट नेमके कोणत्या आधारावर आहेत, याबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही. कंपन्यांकडून अधिकृत निवेदन न आल्याने हा अलर्ट कोणत्याही अधिकृत घोषणेवर आधारित नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अशा नोटिफिकेशननंतर अनेक युजर्स चिंता व्यक्त करत आहेत की, दरवाढ खरोखरच लागू होणार का?
Recharge Hike | लोकप्रिय प्लॅनची किंमत किती वाढू शकते? :
महिन्याच्या 199 रुपयांच्या प्लॅनची किंमत वाढून 222 रुपये होऊ शकते. तर 899 रुपयांच्या लॉन्ग-टर्म प्लॅनची किंमत वाढून 1006 रुपये इतकी होण्याची शक्यता आहे. जर हा अंदाज खरा ठरला, तर सर्व ऑपरेटरच्या वापरकर्त्यांना अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. कंपन्या म्हणतात की, ग्राहक अनुभव सुधारण्यासाठी आणि 5G कव्हरेज वाढवण्यासाठी गुंतवणूक करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी दरवाढ अपरिहार्य ठरू शकते. (Mobile Recharge Hike)
या दरम्यान Airtel ने दोन स्वस्त प्रीपेड प्लॅन 121 रुपये आणि 181 रुपये हे बंद केले आहेत. या प्लॅनमध्ये कमी किंमतीत मोठे फायदे दिले जात होते आणि 30 दिवसांची वैधता होती. हे प्लॅन बंद होणे हेच भविष्यातील दरवाढीचे पहिले लक्षण असल्याचे तज्ञांचे मत आहे.






