Ahilyanagar-Nashik Highway | मध्य महाराष्ट्रातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांना जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या कोपरगाव-मालेगाव महामार्गाच्या चार पदरी काँक्रिटीकरणासाठी केंद्र सरकारकडून तब्बल 980 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
हा महामार्ग उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा मानला जातो. त्यामुळे या रस्त्याच्या सुधारणा प्रकल्पाकडे अनेक वर्षांपासून नागरिकांचे आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष लागले होते. अखेर हा बहुप्रतीक्षित निर्णय जाहीर झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाची मंजुरी, कामाला लवकरच गती :
कोपरगाव-येवला–मनमाड-मालेगाव या 76 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे पूर्ण काँक्रिटीकरण आणि चार पदरीकरण करण्यासाठी केंद्रीय रस्ता वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने निधी मंजूर केला आहे. त्यामुळे लवकरच या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला वेग येण्याची शक्यता आहे. (Ahilyanagar-Nashik Highway)
मालेगाव आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत या मार्गाची अवस्था अतिशय खराब झाल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. रस्त्यावरील अपघातांची संख्याही वाढली होती. त्यामुळे हा महामार्ग चार पदरी आणि मजबूत काँक्रिटीकरणाचा व्हावा, अशी मागणी सातत्याने होत होती.
येवला शहरासाठी उड्डाणपूल आणि बायपासची मागणी :
या महामार्गाच्या मंजुरीसाठी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पत्रव्यवहार करत या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत सविस्तर माहिती दिली होती. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून या प्रकल्पासाठी भरीव निधी मंजूर झाला आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, येवला शहरात वाढणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता भुजबळ यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला उड्डाणपूल आणि बाह्य वळण रस्त्याचा (बायपास) समावेश करण्याची सूचना केली आहे. यामुळे भविष्यात येवला शहरातील वाहतूक समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची शक्यता आहे. (opargaon Malegaon Highway)
शिर्डीला जाणाऱ्या भाविकांसाठी मोठा दिलासा :
हा महामार्ग केवळ दोन जिल्हेच नाही तर दोन विभागांना जोडणारा असल्याने त्याचे महत्त्व अधिक वाढते. विशेषतः मालेगाव व परिसरातून साईनगरी शिर्डी येथे जाणाऱ्या लाखो भाविकांसाठी हा मार्ग प्रमुख आहे. महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर कोपरगाव ते मालेगाव प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे.
या प्रकल्पामुळे व्यापार, उद्योग, पर्यटन आणि दळणवळणाला चालना मिळणार असून संपूर्ण परिसराच्या आर्थिक विकासात मोठी भर पडणार आहे. आता नागरिकांना केवळ प्रत्यक्ष काम सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.






