धक्कादायक! ‘या’ मंत्र्याच्या कार्यालयात ‘इतक्या’ हजारांची लाच घेताना एकाला पकडलं

On: February 13, 2026 1:00 PM
Maharashtra Corruption News
---Advertisement---

Maharashtra Corruption News | महाराष्ट्राच्या सत्ताकेंद्र असलेल्या मंत्रालयात गुरुवारी मोठी खळबळ उडाली, जेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) थेट मंत्र्यांच्या दालनात सापळा रचत कारवाई केली. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांच्या कार्यालयातील एका लिपिकाला ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून विरोधकांनी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप सुरू केले आहेत.

मंत्रालयाच्या मुख्य इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर ही कारवाई पार पडली. एसीबीने संबंधित कर्मचाऱ्याला ताब्यात घेतल्यानंतर झिरवाळ यांच्या कार्यालयालाही सील करण्यात आले. या प्रकरणाचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत जातात, याचा तपास सध्या सुरू आहे.

नेमकं काय घडलं झिरवाळांच्या दालनात? :

मिळालेल्या माहितीनुसार, परवाना नूतनीकरणाच्या कामासाठी लिपिक राजेंद्र ढेरंग याने तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी ३५ हजार रुपये स्वीकारण्याचे ठरल्याची माहिती एसीबीला मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचला. गुरुवारी ठरलेल्या वेळी पैसे स्वीकारताना त्याला रंगेहात पकडण्यात आले.

या कारवाईनंतर काही धक्कादायक नावे समोर आल्याची चर्चा आहे. मंत्र्यांचे खासगी सचिवही चौकशीच्या कक्षेत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती अद्याप जाहीर झालेली नाही.

Maharashtra Corruption News | इतिहासातील तिसरी कारवाई; राजकीय आरोप-प्रत्यारोप :

मंत्रालयातील मंत्र्यांच्या दालनात एसीबीने कारवाई करण्याची ही तिसरी वेळ मानली जात आहे. यापूर्वी काँग्रेस सरकारच्या काळात राजेंद्र दर्डा यांच्या कार्यालयावर कारवाई झाली होती. तसेच भाजपचे नेते एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांच्या कार्यालयातील स्वीय सहाय्यकावर लाचखोरीप्रकरणी कारवाई झाली होती.

दरम्यान, नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी प्रतिक्रिया देताना संबंधित कर्मचारी हा सरकारी सेवक असून त्याच्या वैयक्तिक कृत्याशी माझा संबंध नसल्याचे स्पष्ट केले. मात्र चौकशीत जर कोणतेही धागेदोरे माझ्यापर्यंत पोहोचले, तर तत्काळ राजीनामा देईन, असे त्यांनी सांगितले. विरोधी पक्षांनी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून या घटनेमुळे महायुती सरकार अडचणीत सापडल्याचे चित्र आहे.

News Title: ACB Raid in Maharashtra Mantralaya: Clerk Caught Red-Handed Taking ₹35,000 Bribe in Minister Narhari Zirwal’s Office

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now