Pune Accident | पुणे जिल्ह्यातील मोरगाव रस्त्यावर बुधवारी संध्याकाळी एक अत्यंत भयावह रस्ता अपघात घडला. भरधाव वेगाने धावणाऱ्या कारने पिकअप ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात एकूण आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सात पुरुष आणि एक महिला यांचा समावेश आहे. (Pune Accident News)
ही दुर्घटना सायंकाळी सुमारे ६ वाजून ४५ मिनिटांनी जेजुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत, किर्लोस्कर कंपनीजवळील श्रीराम ढाब्यासमोर घडली. घटनेच्या वेळी पिकअप ट्रकमधून फ्रीज खाली उतरवण्याचे काम सुरू होते. त्या वेळी भरधाव वेगात आलेल्या कारने ट्रकला जोरदार धडक दिली आणि काही सेकंदांत या मृत्यूच्या घटनेने परिसरात हाहाकार माजवला.
अपघातातील मृत आणि जखमींची माहिती स्पष्ट :
या अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर जेजुरी येथील शांताई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये पुणे जिल्ह्यातील पुरंदर, भोर, इंदापूरसह उत्तर प्रदेश, राजस्थान येथील नागरिकांचा समावेश आहे. (Pune Accident News)
मृतदेह जेजुरी ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यामुळे परिसरात दुःखाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली असून अधिक तपास सुरू आहे.
Pune Accident | अपघातातील मृतांची नावे खालीलप्रमाणे :
सोमनाथ रामचंद्र वायसे – पुरंदर, पुणे
रामू संजीवनी यादव – पुरंदर, पुणे
अजय कुमार चव्हाण – उत्तर प्रदेश
अजित अशोक जाधव – कांजळे, भोर
किरण भारत राऊत – पवारवाडी, इंदापूर
अश्विनी संतोष एस.आर. – सोलापूर
अक्षय संजय राऊत – झारगडवाडी, बारामती
एक अज्ञात पुरुष – ओळख अद्याप अपूर्ण
वाहनधारकांचा निष्काळजीपणा ठरतोय जीवघेणा! :
सदर प्रकरणातून पुन्हा एकदा स्पष्ट होतं की, रस्त्यावर वाहन चालवताना क्षणभराची चूकही किती महागात पडू शकते. भरधाव वेग, निष्काळजीपणा आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष यामुळे अशा दुर्घटना वारंवार घडत आहेत. प्रशासनाने या भागात वेगमर्यादा पाळण्यावर अधिक लक्ष द्यावे आणि जनजागृती मोहिमा राबवाव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.






