आंदेकर टोळीतील ३ जण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार! कोर्टाने दिली परवानगी

On: December 11, 2025 11:32 AM
Andekar Gang (1)
---Advertisement---

Pune News | पुणे शहरातील चर्चित आयुष कोमकर खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला कुख्यात गुंड आणि आंदेकर टोळीचा (Andekar gang) प्रमुख बंडू आंदेकर तसेच त्याचे कुटुंबीय आगामी पुणे महापालिका (Pune Mahapalika) निवडणुकीत उभे राहू शकणार आहेत. विशेष मकोका न्यायालयाने या तिन्ही जणांच्या अर्जावर सुनावणी करून निवडणूक लढवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे महापालिकेच्या राजकारणात नव्या घडामोडींना सुरुवात झाली आहे.

विशेष न्यायाधीश एस.आर. साळुंखे यांनी निर्णय देताना स्पष्ट केलं की, निवडणूक लढवणं हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असून त्यासाठी न्यायालयाची परवानगी घेण्याची कोणतीही सक्ती नाही. आरोपींवर गुन्हे असले तरी लोकप्रतिनिधित्व कायदा त्यांना थेट अपात्र ठरवत नाही, असंही न्यायालयाने नमूद केलं.

निवडणूक लढवण्यास कायदेशीर अडथळा नाही :

बंडू ऊर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर (70), लक्ष्मी उदयकांत आंदेकर (60) आणि सोनाली वनराज आंदेकर (36) यांनी त्यांच्या वकिलांमार्फत निवडणूक अर्ज स्वतः दाखल करण्याची विनंती न्यायालयात केली होती. अ‍ॅड. मिथुन चव्हाण यांनी आरोपींना निवडणूक लढवण्याचा संविधानिक व कायदेशीर अधिकार असल्याचं सांगितलं. न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य करत म्हटलं की, आरोपींना अर्ज भरताना गरज पडल्यास पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याचा निर्णय प्रशासन घेईल.

या निर्णयामुळे आंदेकर कुटुंब महापालिका निवडणुकीच्या रणांगणात थेट उतरू शकत असल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.

Pune News | आयुष कोमकर खून प्रकरणाची पार्श्वभूमी :

या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात एका हिंसक टोळीसंघर्षातून झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj andekar) यांची गेल्या वर्षी गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. याच हत्येचा बदला म्हणून आयुष कोमकरला 5 सप्टेंबर रोजी, गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला गोळ्या झाडून ठार मारण्यात आलं. तपासात हे बदला घेण्यासाठी केल्याचं उघड झालं.

या दोन्ही हत्यांमध्ये आंदेकर कुटुंबातील अनेक सदस्य आरोपी आहेत. एकूण 15 जण न्यायालयीन कोठडीत असून आता कोर्टाच्या निर्णयानंतर ते कोठडीतूनच निवडणूक लढवण्याची शक्यता गडद झाली आहे.

दरम्यान, पुणे महापालिका निवडणुकीत आंदेकर कुटुंब कितपत प्रभाव टाकणार, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. न्यायालयीन परवानगीनंतर या प्रकरणातील राजकीय रंग अधिक गडद झाल्याचं स्पष्ट दिसत आहे.

News title : 3 members of Andekar gang to contest elections! Court gives approval

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now