Zomato Hikes | झोमॅटोने फेस्टिव सीझनच्या आधी ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. ऑनलाइन फूड ऑर्डर करणाऱ्यांसाठी आता प्रत्येक ऑर्डरसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. कारण कंपनीने आपल्या प्लॅटफॉर्म फीमध्ये तब्बल 20 टक्क्यांनी वाढ केली आहे. आधी 10 रुपये घेतली जाणारी ही फी आता 12 रुपये आकारली जाणार आहे. या दोन रुपयांच्या वाढीमुळे ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त ताण पडणार आहे. ही नवी फी झोमॅटो सेवा देत असलेल्या सर्व शहरांत लागू करण्यात आली आहे. (Zomato platform fee)
गेल्या काही काळापासून झोमॅटो सातत्याने आपली प्लॅटफॉर्म फी वाढवत असल्याचं दिसून येत आहे. गेल्या वर्षीही फेस्टिव सीझनच्या आधी कंपनीने आपली फी 6 रुपयांवरून 10 रुपये केली होती. त्याआधी तीन महिन्यांतच 5 रुपयांवरून 6 रुपये करण्यात आले होते. म्हणजेच कंपनी दर काही महिन्यांनी शुल्क वाढवत आहे. यामुळे केवळ ग्राहकच नव्हे तर रेस्टॉरंट मालकांनाही या वाढीचा फटका बसणार आहे.
स्विगीनेही केली शुल्कवाढ :
झोमॅटोचा थेट स्पर्धक असलेला स्विगीनेही काही शहरांमध्ये प्लॅटफॉर्म फी 14 रुपये आकारायला सुरुवात केली आहे. सणासुदीच्या काळात मागणी मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्याचबरोबर पुरवठा साखळीवरील खर्चही वाढतो. त्यामुळे दोन्ही कंपन्या या वाढत्या खर्चाचा ताळमेळ साधण्यासाठी अशा पावलं उचलत आहेत. रॅपिडोसारख्या नव्या फूड डिलिव्हरी सेवांच्या वाढत्या प्रभावामुळे झोमॅटो आपलं कमिशन मॉडेल अधिक परिणामकारक बनवण्याचा विचार करत आहे.
झोमॅटोच्या मते, बाजारातील बदलत्या परिस्थिती आणि वाढत्या ऑपरेशनल खर्चामुळे प्लॅटफॉर्म फी वाढवणं अपरिहार्य होतं. फेस्टिव सीझनमध्ये ऑर्डर वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन कंपनी या काळात आपल्या महसुलात वाढ करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, यामुळे ग्राहकांच्या ऑर्डर करण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
Zomato Hikes | गुंतवणूकदारांचे लक्ष वाढीव शुल्काकडे :
झोमॅटोचा नफा मात्र गेल्या तिमाहीत घटला आहे. जून 2025 संपलेल्या तिमाहीत कंपनीचा नफा 36 टक्क्यांनी घटून 25 कोटी रुपयांवर आला. मागील तिमाहीत हा आकडा 39 कोटी रुपयांचा होता. महसुलातील ही घसरण कंपनीसाठी चिंतेची बाब मानली जात आहे.
तरीही, शेअर बाजारात झोमॅटोची कामगिरी चांगली राहिली आहे. 2 सप्टेंबर रोजी कंपनीचा शेअर 0.55 टक्क्यांनी वाढून 322.85 रुपयांवर बंद झाला. गेल्या सहा महिन्यांत झोमॅटोच्या शेअरने तब्बल 45 टक्क्यांची वाढ केली असून, गुंतवणूकदारांना चांगला फायदा दिला आहे. (Zomato platform fee)
गेल्या एका वर्षातही या शेअरमध्ये 32 टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र, आता वाढीव प्लॅटफॉर्म फीमुळे ग्राहकांच्या प्रतिक्रिया आणि त्याचा शेअर बाजारावर काय परिणाम होईल, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.






