Women’s World Cup | १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरुष संघाने जेव्हा लॉर्ड्सच्या मैदानावर एकदिवसीय विश्वचषक उंचावला होता. आज, याच ऐतिहासिक क्षणाची पुनरावृत्ती करण्याची संधी भारतीय महिला संघाला मिळाली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील आपला संघ विश्वविजेतेपदाच्या उंबरठ्यावर उभा असून, मुंबईजवळच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणाऱ्या अंतिम सामन्यात त्यांच्यासमोर दक्षिण आफ्रिकेचे तगडे आव्हान असणार आहे.
या सामन्याचे वैशिष्ट्य म्हणजे, दोन्ही संघ आपले पहिले-वहिला विश्वविजेतेपद मिळवण्यासाठी आतुर आहेत. त्यामुळे या रविवारी महिला क्रिकेटला एक नवा विश्वविजेता मिळणार हे निश्चित आहे. यापूर्वी मिताली राजच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने २००५ आणि २०१७ मध्ये विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. मात्र, २००५ मध्ये ऑस्ट्रेलियाने आणि २०१७ मध्ये इंग्लंडने भारताचे स्वप्न भंग केले होते. पण यावेळी चित्र वेगळे आहे. (Women’s World Cup) भारतीय संघ आपल्या घरच्या मैदानांवर खेळत आहे आणि लाखो चाहत्यांचा अभूतपूर्व पाठिंबा आहे.
दोन्ही संघ तुल्यबळ
भारताने उपांत्य फेरीत बलाढ्य आणि अनेकवेळा विश्वविजेतेपद मिळवलेल्या ऑस्ट्रेलिया संघावर विक्रमी विजय मिळवत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा प्रवास अधिक सातत्यपूर्ण राहिला आहे. त्यांनी साखळी फेरीत सातपैकी पाच सामने जिंकले. त्यानंतर उपांत्य सामन्यात त्यांनी माजी विजेत्या इंग्लंडला धूळ चारून आपली ताकद सिद्ध केली. दोन्ही संघ अत्यंत आत्मविश्वासाने अंतिम सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. (Women’s World Cup)
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत ३३ सामने झाले आहेत. यात २० विजय मिळवत भारताचे पारडे जड आहे. मात्र, विश्वचषकात दोन्ही संघांनी प्रत्येकी तीन-तीन सामने जिंकले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, भारतीय संघाने २०१७ पासून ‘आयसीसी’ स्पर्धांमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलेले नाही. त्यामुळे, यावेळी आफ्रिकेला पराभूत करून हिशोब चुकता करण्याची संधी भारतीय संघाला असेल.
Women’s World Cup | प्रमुख खेळाडूंकडे लक्ष
या सामन्यांमध्ये काही प्रमुख खेळाडूंकडे लक्ष असतील. भारताला धमाकेदार सुरुवात देण्याची संपूर्ण जबाबदारी स्मृती मनधाना वर आहे. स्पर्धेत ३८९ धावांसह ती सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. उपांत्य फेरीत १२७ धावांची अविस्मरणीय खेळी जेमिमा रॉड्रिग्ज ने (Jemimah Rodrigues) केली आहे. आता घरच्या मैदानावर तिच्याकडून अधिक मोठी खेळी अपेक्षित आहे. कर्णधार हरमनप्रीतकडे (Harmanpreet Kaur) मोठे सामने आपल्या बाजूने वळवण्याची क्षमता आहे.
दक्षिण आफ्रिकेची कर्णधार आणि सर्वाधिक धावा करणारी फलंदाज. तिने ८ सामन्यांत ६७.१४ च्या सरासरीने ४७० धावा केल्या आहेत. तिला लवकर बाद करणे, हे भारतासमोरचे सर्वात मोठे आव्हान असेल. आफ्रिकेची सर्वात खतरनाक अष्टपैलू खेळाडू मारिझान काप (Marizanne Kapp) हीने स्पर्धेत १२ बळी घेण्यासह तिने २०४ धावा केल्या आहेत. मोठी फटकेबाजी करण्याची क्षमता असलेली नदीन डी क्लर्क (Nadine de Klerk), भारताविरुद्धच्या साखळी सामन्यात ५४ चेंडूंत नाबाद ८३ धावा करून आफ्रिकेला विजय मिळवून देणारी खेळाडू आहे. (Women’s World Cup) भारतीय महिला संघ यावेळी इतिहास घडवण्यास सज्ज आहे. कोट्यवधी भारतीयांच्या आशा आणि अपेक्षा घेऊन हा संघ मैदानावर उतरणार आहे.






