Lipstick Consumption | लिपस्टिक हे आजकाल महिलांच्या मेकअप किटमधील अविभाज्य घटक बनले आहे. ऑफिसला जाण्यापासून ते अगदी घरातही अनेक महिला रोज लिपस्टिक लावतात. केवळ लिपस्टिक लावल्यानेही चेहऱ्याला एक वेगळा लुक येतो. मात्र, लिपस्टिक बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांबद्दल आणि ती नकळत पोटात जाण्याबद्दल नेहमीच चिंता व्यक्त केली जाते. एका महिलेच्या संपूर्ण आयुष्यात तिच्या पोटात किती लिपस्टिक जाते, याचा कधी विचार केला आहे का?
थक्क करणारा आकडा: किती लिपस्टिक जाते पोटात? :
लिपस्टिक लावल्यानंतर खाताना, पिताना किंवा अगदी नकळतपणे ओठांवर जीभ फिरवल्याने लिपस्टिकचा काही अंश पोटात जातो. तुम्हाला वाटेल ही मात्रा अगदी नगण्य असेल, काही ग्रॅममध्ये असेल. पण वास्तव धक्कादायक आहे. ‘वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स’ने दिलेल्या माहितीनुसार, जर एखादी महिला नियमितपणे लिपस्टिक लावत असेल, तर ती तिच्या संपूर्ण आयुष्यात अंदाजे ४ ते ९ पौंड (म्हणजेच सुमारे १.८ ते ४ किलोग्रॅम) लिपस्टिक खाते.
हा आकडा निश्चितच मोठा आणि विचार करायला लावणारा आहे. आपण नकळतपणे किती प्रमाणात रसायने पोटात घेत आहोत, हे यावरून लक्षात येते. त्यामुळे लिपस्टिकची निवड करताना आणि वापरताना काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
Lipstick Consumption | घातक रसायने आणि लिपस्टिक निवडतानाची काळजी :
लिपस्टिकमध्ये अनेकदा शिसे (Lead), कॅडमियम (Cadmium), पॅराबेन्स (Parabens), थॅलेट्स (Phthalates), BHA, पेट्रोलियम, कृत्रिम रंग, ट्रायक्लोसन, फॉर्मल्डिहाइड, टोल्यून यांसारखी हानिकारक रसायने असू शकतात. त्यामुळे लिपस्टिक खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. नेहमी चांगल्या ब्रँडची आणि पॅराबेन-फ्री लिपस्टिक निवडा. त्यातील घटक तपासण्याची सवय लावा.
कोणतीही लिपस्टिक किंवा लिप बाम लावल्यानंतर जर ओठ कोरडे पडत असतील किंवा कोणत्याही प्रकारची ॲलर्जी (खाज, जळजळ) होत असेल, तर त्याचा वापर तात्काळ थांबवा आणि त्वचातज्ञांचा (Dermatologist) सल्ला घ्या. ओठांची त्वचा नाजूक असल्याने नैसर्गिक तेल, व्हिटॅमिन ई किंवा चांगले मॉइश्चरायझर असलेले प्रोडक्ट्स निवडा. तसेच, रात्री झोपण्यापूर्वी लिपस्टिक पूर्णपणे काढून ओठांना मॉइश्चरायझ करा आणि आठवड्यातून एकदा ओठांना स्क्रब करून डेड स्किन काढून टाका.






