Maharashtra | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यातील जवळपास ७० लाख एकरापेक्षा अधिक शेती पाण्याखाली गेली आहे. अतिवृष्टीमुळे धान्य, कापूस आणि भाजीपाला पिके पूर्णपणे उध्वस्त झाली आहेत. यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
ही गोष्ट लक्षात घेऊन राज्य सरकारने २१०० कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी लगेच पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, मंत्र्यांनी थेट दौरा करून परिस्थितीची पडताळणी करण्यास सांगितले आहे. यामधून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी, असा शासनाचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले आहे.
कृषिमंत्री भरणे यावर काय बोलले? :
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी नुकताच पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी सांगितले की, यंदा विशेषतः ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सगळ्यात जास्त पाऊस झाल्याने जालना, नांदेड, धाराशिव, अहिल्यानगर (Ahilyanagar) आणि बीड (Beed) या जिल्ह्यांमध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात जालन्यात (Jalna) २ लाख ५४ हजार एकर शेतीचे नुकसान झाले असून, नांदेड जिल्ह्यात सर्वात जास्त नुकसान झाले आहे.
त्यांनी असेही सांगितले आहे की, महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनामे सुरू असून, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी शासन जास्तीत जास्त प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीवरून ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी राज्य व केंद्र सरकारचे नियम महत्त्वाचे ठरणार आहेत.
Maharashtra | नागरिकांचे जनजीवन विस्कळीत :
या अतिवृष्टीमुळे फक्त शेतीच नाही तर जनजीवन सुद्धा विस्कळीत झाले आहे. अनेक गावांमध्ये पाणी गेलं आहे, तर काही ठिकाणी घर पाण्याखाली गेली आहेत, घरांची पडझड झाली आहे आणि पशुधनही वाहून गेले आहे. या सर्व गोष्टींमुळे शेतकरी पूर्णपणे अस्वस्थ झाले आहेत.
दरम्यान, ही परिस्थिती लक्षात घेता कृषी मंत्री भरणे (Dattatray Bharne) यांनी स्पष्ट केलं आहे की, शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात मदत करणे हे शासनाचे प्रथम काम आहे. ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत आणि ती मागणी चुकीची नाहीये. मात्र, याबाबत जो निर्णय असेल तो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्र येऊन योग्य तो पर्याय काढतील.






