Petrol-Diesel Price | जागतिक बाजारात पुन्हा एकदा तेलाच्या किमती वाढण्याची चिन्हं दिसत आहेत. प्रमुख तेल उत्पादक देशांकडून पुरवठा कमी होण्याची शक्यता आणि अमेरिकेकडून रशियन कंपन्यांवर निर्बंध लादल्यानंतर भारताने आपल्या ऊर्जा सुरक्षेसाठी मोठी तयारी सुरू केली आहे. देश आता आणखी दोन नवीन ठिकाणी तेल साठे (Oil Reserves) बांधण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे भविष्यात इंधन संकट उद्भवल्यास भारताकडे पुरेसा साठा उपलब्ध असेल. (Petrol-Diesel Price Rate)
मे महिन्यात कच्च्या तेलाच्या किंमती गेल्या चार वर्षांतील नीचांकी पातळीवर म्हणजेच प्रति बॅरल 60 डॉलर्सपर्यंत खाली आल्या होत्या. पण जूनमध्ये त्या पुन्हा वाढून 76 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्या. सध्या ब्रेंट क्रूड तेल 65 डॉलर प्रति बॅरलच्या खाली व्यापार करत असले तरी, जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर तज्ञांचा इशारा आहे की लवकरच या किंमती वाढू शकतात.
भारत ISPRLमार्फत साठे वाढवतोय :
इंडियन स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह लिमिटेड (ISPRL) ही सरकारी कंपनी भारतासाठी तेल साठवण्याचे काम करते. मिंटच्या अहवालानुसार, सरकारने सध्या असलेल्या तीन साठ्यांव्यतिरिक्त आणखी दोन ठिकाणी मोठे साठे उभारण्याची योजना आखली आहे. संसदीय समितीच्या ताज्या अहवालानुसार, ऑक्टोबर 2024 पर्यंत भारताची साठवण क्षमता 5.3 मिलियन टन आहे, मात्र प्रत्यक्षात फक्त 3.6 मिलियन टन तेल भूमिगत गुहांमध्ये साठवले गेले आहे.
सरकार आणि ISPRL सध्या खरेदीला गती देण्यासाठी काम करत आहेत. कमी दरांचा फायदा घेत साठे पुन्हा भरून काढण्यावर भर दिला जातोय. तेलाच्या किमती कमी असताना साठा वाढवणे ही ऊर्जा सुरक्षेची दीर्घकालीन रणनीती असल्याचे तज्ञांचे मत आहे.
Petrol-Diesel Price | अमेरिकेचे निर्बंध आणि रशियन पुरवठ्याचा परिणाम :
अमेरिकेने रशियन दिग्गज कंपन्या रोसनेफ्ट आणि लुकोइलवर लादलेले निर्बंध भारतीय बाजारावर थेट परिणाम करू शकतात. या निर्बंधांमुळे रशियाकडून मिळणारा तेल पुरवठा घटणार आहे. 21 नोव्हेंबरपासून या निर्बंधांचा प्रभाव लागू होणार असून, त्यामुळे भारतीय रिफायनरीजना पर्यायी स्रोत शोधावे लागतील.
रेटिंग एजन्सी ICRA चे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रशांत वशिष्ठ यांनी सांगितले की, “रशियन तेलावर मिळणारा डिस्काउंट कमी होत आहे आणि पुरवठा घटल्यामुळे जागतिक बाजारातील दरांवर परिणाम होणार आहे. किंमती आधीच वाढू लागल्या आहेत आणि आगामी काळात आणखी वाढ होऊ शकते.”
OPEC च्या निर्णयामुळे पुरवठ्यावर परिणाम :
दुसरीकडे, तेल उत्पादक देशांचा संघ OPEC Plus ने डिसेंबरसाठी दररोज १,३७,००० बॅरल उत्पादन वाढवण्याची घोषणा केली आहे, मात्र जानेवारी ते मार्च 2026 या कालावधीत उत्पादन वाढ थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. २ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या निवेदनात, हवामानातील बदलांमुळे आठ देश उत्पादन वाढवू शकणार नाहीत, असं स्पष्ट करण्यात आलं. (Petrol-Diesel Price)
यामुळे जागतिक बाजारात पुरवठा आणखी घटेल आणि नैसर्गिकरित्या पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तज्ञांच्या मते, “अमेरिकेचे निर्बंध, OPEC चा निर्णय आणि मध्य पूर्वेतील तणाव हे तिन्ही घटक एकत्र आल्यास पेट्रोल-डिझेल दर वाढण्याची शक्यता निश्चित आहे.”






