Pune News | सिंहगड रस्ता परिसरातील वाढत्या अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. सकाळी आणि सायंकाळी या भागातील मुख्य रस्त्यांवर दुचाकी, चारचाकी वाहनांची मोठी गर्दी होत असून, नागरिकांना अक्षरशः कोंडीतून वाट काढावी लागत आहे. महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिस यांच्याकडून ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांचा संताप वाढला आहे.
अतिक्रमणामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा
सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत वडगाव बुद्रुक, सनसिटी रस्ता, मुख्य सिंहगड रस्ता आणि धायरी परिसरातील रस्ते पथारीवाले, भाजी विक्रेते आणि टपऱ्यांनी व्यापले आहेत. रस्त्यांच्या कडेला झालेल्या या अतिक्रमणामुळे वाहनांना वळण घेणे कठीण झाले आहे. अनेक ठिकाणी तर विक्रेत्यांनी थेट रस्त्यावरच दुकानं उभी केली आहेत, ज्यामुळे सार्वजनिक रस्ता व्यापला जात आहे. या सर्व गोष्टीनमुळे वाहतूक कोंडी ही आता दैनंदिन बाब झाली असून, कामावर जाणारे आणि शाळकरी मुले दोघेही त्रासाला सामोरे जात आहेत.
गोयलगंगा सोसायटीसमोरील हॉटेल व्यावसायिकांनी तर थेट पार्किंगच्या जागेत शेड उभारून खुर्च्या-टेबल मांडल्या आहेत. परिणामी, पार्किंगसाठी जागा उरलेली नाही आणि वाहनधारकांना त्यांच्या गाड्या रस्त्यावरच उभ्या कराव्या लागतात. त्यामुळे आधीच अरुंद रस्ता अधिकच गर्दीचा झाला आहे. नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही अतिक्रमण विभागाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.
Pune Traffic | कोंडी सोडविण्याकडे दुर्लक्ष
वाहतूक पोलिसांकडून या कोंडीवर काही उपाययोजना केल्या जातील, अशी नागरिकांना अपेक्षा होती. मात्र वास्तव वेगळेच दिसत आहे. पोलिस हे कोंडी सोडविण्याऐवजी चलन कापण्यातच अधिक गुंतलेले दिसतात. त्यामुळे सकाळ-सायंकाळच्या गर्दीच्या वेळी वाहनधारकांचा जीव अक्षरशः गुदमरतो. खाऊ गल्ली चौक, नवा पूल परिसर आणि हिंगणे चौक येथे तर कोंडीचा कळस गाठला आहे.
सिंहगड रस्ता हा पुण्यातील एक महत्त्वाचा मार्ग असून, दररोज हजारो वाहनं या रस्त्याने प्रवास करतात. अशा परिस्थितीत अतिक्रमण आणि वाहतूक व्यवस्थेतील शिथिलता यामुळे हा मार्ग वाहनधारकांसाठी त्रासदायक ठरत आहे. प्रशासन आणि पोलिस विभागाने समन्वय साधून तातडीने कारवाई केली नाही, तर ही समस्या आणखी गंभीर होईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
स्थानिक नागरिक आणि सोसायटी संघटनांनी या समस्येकडे महापालिकेचे लक्ष वेधले आहे. त्यांनी प्रशासनाला लेखी तक्रारी दिल्या असून, अतिक्रमण हटवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची मागणी केली आहे. काही ठिकाणी नागरिकांनी स्वखर्चाने रस्ते मोकळे करण्याचा प्रयत्न केला असला, तरी त्याचा दीर्घकालीन उपाय झाला नाही. सिंहगड रस्ता परिसरातील ही समस्या दूर करण्यासाठी तातडीची आणि ठोस पावले उचलणे अत्यावश्यक बनले आहे.






