Mohan Bhagwat | मुंबईतील वरळी डोममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘मनोमिलन’ कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशातील विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार अजून का मिळालेला नाही, या प्रश्नावर भागवत यांनी थेट प्रतिक्रिया दिली.
गेल्या अनेक वर्षांपासून सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी होत आहे. सध्या केंद्रात भाजपची सत्ता असतानाही हा पुरस्कार अद्याप न मिळाल्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर पत्रकारांनी मोहन भागवत यांना थेट विचारणा केली असता त्यांनी आपल्या शैलीत स्पष्ट उत्तर दिले.
सावरकरांबाबत मोहन भागवत काय म्हणाले? :
या प्रश्नाला उत्तर देताना मोहन भागवत म्हणाले, “सावरकर लाखो-करोडो लोकांच्या हृदयात स्थान मिळवलेले आहेत. भारतरत्न देण्याचा निर्णय ज्या समितीकडे आहे, त्या समितीत मी नाही. मात्र, त्या समितीतील कोणी मला भेटले तर मी नक्की त्यांना विचारेल.” त्यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा सावरकरांना भारतरत्न देण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे.
भागवत यांच्या या प्रतिक्रियेमुळे संघाची भूमिका स्पष्ट झाली असून, सावरकरांचे योगदान केवळ पुरस्कारापुरते मर्यादित नसून ते जनतेच्या मनात आधीच आदराचे स्थान मिळवून आहेत, असा संदेशही त्यांनी दिला आहे.
Mohan Bhagwat | भाजप आणि संघाच्या संबंधांवरही स्पष्ट मत :
यावेळी भाजप सत्तेत आल्यामुळे संघाला “चांगले दिवस” आले का, असा प्रश्नही मोहन भागवत यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी, “भाजप सत्तेत आल्यामुळे आमचे चांगले दिवस आले, असे नाही. उलट लोक आमचं ऐकतात, त्यामुळे त्यांना फायदा होतो. आमचं काम वाढलं आहे. त्यांनी आमची साथ दिली म्हणून त्यांना चांगले दिवस आले,” असे स्पष्ट केले.
तसेच संघ कोणत्याही राजकीय पक्षावर दबाव टाकत नाही आणि संघाच्या शाखांमध्ये राजकारण होत नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. त्यांच्या या विधानांमुळे संघ आणि भाजपच्या संबंधांबाबत सुरू असलेल्या चर्चांनाही नवा दृष्टिकोन मिळाला आहे.






