Whistling at woman case | महिलेला पाहून शिट्टी वाजवणे किंवा तिची ओढणी खेचणे हे केवळ गैरवर्तन नाही, तर तो विनयभंगाचाच गुन्हा आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय बोरिवली न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने सहा महिन्यांच्या कारावासाची आणि एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या निर्णयामुळे रस्त्यावर महिलांशी अश्लील वर्तन करणाऱ्यांना मोठा धक्का बसला असून समाजात जरब निर्माण होण्याची शक्यता आहे. (Whistling at woman case)
अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या या निकालात नमूद करण्यात आले की, अशा कृतींमुळे महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचतो. त्यामुळे कोणतीही महिला असुरक्षित वाटेल असे वर्तन करणे हा गंभीर गुन्हा आहे.
काय आहे प्रकरण? :
ही घटना 22 एप्रिल 2013 रोजी कांदिवली (पश्चिम) येथील चारकोप भागात घडली होती. तक्रारदार महिला भगवती हॉस्पिटलजवळ पाणीपुरीची हातगाडी चालवत होती. आरोपी प्रशांत अरविंद गायकवाड या ठिकाणी त्याच्या बहिणीसोबत आला होता. काही कारणावरून दोघांमध्ये वाद झाला आणि आरोपीने महिलेच्या गाडीचे नुकसान केले. त्यानंतर त्याने महिलेची ओढणी खेचत तिचा विनयभंग केला.
या घटनेनंतर महिलेने चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दीर्घ तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर तब्बल बारा वर्षांनी अखेर या प्रकरणाचा निकाल लागला. सरकारी पक्षाने आरोपीविरुद्ध ठोस पुरावे सादर केले आणि आरोपीचा दोष सिद्ध झाला.
Whistling at woman case | आरोपीला शिक्षा आणि समाजाला संदेश :
न्यायालयाने आरोपी प्रशांत गायकवाड याला विनयभंगाच्या गुन्ह्यात दोषी ठरवत सहा महिन्यांचा तुरुंगवास आणि एक हजार रुपयांचा दंड ठोठावला. न्यायालयाने या निकालाद्वारे महिलांवरील अश्लील हावभाव, शिट्टी वाजवणे किंवा ओढणी खेचणे यासारख्या वर्तनावर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट संदेश दिला आहे.
या निर्णयामुळे महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या सन्मानाच्या रक्षणासाठी न्यायालयाने एक मजबूत पाऊल उचलले आहे. ‘रस्त्यावर शिट्टी वाजवणं’ किंवा ‘टवाळखोरपणा’ आता केवळ लहानशा गंमतीत मोडणार नाही, तर तो कायद्याच्या कचाट्यात आणणारा गंभीर गुन्हा मानला जाईल.






