Muralidhar Mohol | पुण्यात सध्या गाजत असलेलं प्रकरण म्हणजे कुख्यात गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaiwal) व इतर गुन्हेगारीबद्दलच्या प्रकरणाबाबत पत्रकारांनी खासदार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांना प्रश्न विचारले, मात्र त्यांनी एक शब्दही न बोलता उठून काढता पाय घेतला.
पुण्यात गुन्हेगारांचा उच्छाद :
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. अनेक टोळ्या दिवसाढवळ्या उच्छाद मांडताना दिसत आहेत. आधी आंदेकर-कोमकर टोळीचे युद्ध त्यानंतर घायवळ टोळीने सामान्य नागरिकांवर लक्ष ठेवून किरकोळ वादातून गोळ्या चालवल्या. त्याचबरोबर, टिपू पठाण टोळीचा वेगळाच खेळ सुरू आहे. या सर्व घटनांमुळे पुणेकर व्यथित असताना, पहिल्या टर्ममध्ये केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळवलेले मुरलीधर मोहोळ गुन्हेगारीवर बोलायला तयार दिसले नाहीत.
रविवारी, 9 नोव्हेंबर 2025 रोजी, मोहोळ यांनी पुण्यातील स. प. महाविद्यालय, टिळक रोड येथे संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘पुणे रन फॉर युनिटी’ महामॅरेथॉन संदर्भात पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेदरम्यान पत्रकारांनी पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत प्रश्न विचारले, मात्र मोहोळांनी एक शब्दही न बोलता उठून गेले. गुन्हेगारीवर बोलण्याऐवजी मॅरेथॉनवरच लक्ष केंद्रित करण्याचे सांगितले.
Muralidhar Mohol | कोथरूडमध्ये गुन्हेगारी वाढली :
कोथरूड परिसरातून येणाऱ्या मोहोळांच्या क्षेत्रातच गेल्या महिन्यात निलेश घायवळ (Nilesh Ghaiwal Gang) टोळीने गोळीबार केला होता. त्यानंतर घायवळ टोळीचे राजकीय कनेक्शनही समोर आले. तसेच गजा मारणेची टोळीसुद्धा अधून मधून याठिकाणी स्वतःचे अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करत असते. शिवसेना नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा हात घायवळवर असल्याचा आरोप केला. तसेच, बोगस पासपोर्ट, नावे बदलणे, दोन ठिकाणी मतदान ओळखपत्र, करोडोंची संपत्ती जमवून घायवळ परदेशात फरार झाला आहे.
पुण्यात इतकी गुन्हेगारी घडत असतानाही खासदार मोहोळांनी सहजतेने प्रश्न टाळल्याने पत्रकारांमध्ये आणि नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. पत्रकारांनी मुरलीधर मोहोळ यांना पुन्हा विचारले, “गुन्हेगारीवर तरी बोला,” तरीही मोहोळांनी फक्त मॅरेथॉनवर लक्ष द्यावे, असे सांगून पत्रकार परिषदेमधून काढता पाय घेतला.






